वाडा : कोसबाड येथील हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
वाडा तालुक्यात आज (१९ जुन) पावसाने जोरदार हजेरी लावली. वाडा, खानिवली, पालसई, गोऱ्हे, कुडूस, डाकिवली या भागात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पहाटे ५ वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. काही शाळांनी तर पावसाचा सातत्याने वाढणारा जोर पाहून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळेला, खाजगी शिकवणीला सुट्टी देण्यात आली.
सकाळी १० वाजता शासकीय यंत्रणेकडून पुढील ३ तासांत पालघरमध्ये ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सूचनांचे पालन करावे तसेच २० व २१ जुन रोजी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असा संदेश देण्यात आला.












