वर्धा: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात वास्तव्य होते. २०१७ मध्ये ते विद्यापीठातील नागार्जुन गेस्ट हाऊसमध्ये रहायला आले होते, अशी आठवण विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे सांगतात. त्यांना अनेकजण भेटायला यायचे. पण लिखाणात व्यत्यय म्हणून ते भेटी टाळायचे. हलकी न्याहारी व हलकाच आहार ते घेत आणि वाचन, लिखाणात स्वतःला गुंतवून घेत. इथे असतांना त्यांनी आर्वी, यवतमाळ, गोंदिया या ठिकाणी कार्यक्रमास हजेरी लावली होती. फावल्या वेळात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना झाडावर कलम बांधण्याचे प्रशिक्षण ते देत.
विद्यापीठालगत असलेल्या निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कला त्यांनी भेटी दिल्या होत्या. समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे सांगतात की या आमच्या पार्कमध्ये मारुती चितमपल्ली या नावाने एक बाग पण आहे. विविध दुर्मिळ झाडे त्यात आता वाढली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पार्कमध्ये सलग तीन वर्ष वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांना दुर्मिळ वनास्पतीचा सखोल अभ्यास होता. पेंच येथून त्यांनी नवनवीन व पारंपरिक औषधी बीज संकलित केले होते. त्याची याठिकाणी लागवड करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. आमच्या निसर्गप्रेमीच्या कुटुंबातील व्यक्तीच काळाआड गेली, अशी भावना बेलखोडे व्यक्त करतात.












