मध्यप्रदेशामधील इंदोर येथील उद्योजक राजा रघुवंशी याच्या हत्तेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तो आणि त्याची पत्नी सोनम हे दोघे लग्नानंतर त्यांच्या हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. यानंतर सोनमने तिच्या काही साथीदारांसह राजा याची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान राजा रघुवंशी याची हत्या करण्याच्या आधी दोघे पती पत्नी ट्रेकिंग करत असतानाचा एक नवा व्हिडीओ आता समोर आला आहे.
डोंगराळ भागात एका पर्यटकाने ट्रेकिंग करत असताना शूट केलेल्या व्हिडीओमध्ये राजा आणि सोनम दिसून येत आहेत. हा व्हिडीओ २३ मे रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांचा आहे. याच दिवशी दुपारी राजा याची हत्या झाली आणि त्याचा मृतदेह तीन मारेकाऱ्यांना दरीत फेकून दिला. या मारेकऱ्यांना सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी सुपारी दिली होती.
देव सिंह या एका पर्यटकाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सोनम पुढे चालताना दिसत आहे तर तिच्या मागे राजा चढाई करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने पांढरा टी शर्ट घातल्याचे दिसून येत आहे, मेघालय पोलिसांना तोच शर्ट गुन्हा घडला त्या ठिकाणाजवळ साफडला आहे. तसेच सोनमकडे एक प्लास्टीकची पिशवी देखील दिसत आहे, ज्यामध्ये रेनकोट होता असे सांगितले जात आहे. तसेच या दोघांचा पाठलाग सोनमचे सहकारी असलेले इतर तीन आरोपी देखील करत होते.
“मीकाल व्हिडीओ पाहात होते आणि मला इंदोरच्या जोडप्याचे रेकॉर्डिंग सापडले. यामध्ये आम्ही जेव्हा सकाळी ९.४५ वाजता खाली उतरत होतो तेव्हा हे जोडपे वर जात होते. मला वाटतं हे जोडप्याचे शेवटचे रेकॉर्डिंग असेल, आणि सोमनने तोच पांढरा टी शर्ट घातलेला होता, जो राजाच्या मृतदेहाजवळ सापडला. मला आशा आहे की यामुळे मेघालय पोलिसांना मदत होईल,” असे सिंह यांनी इस्टाग्रामवर लिहिले आहे.
२३ मे रोजी झालेल्या या हत्येच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याने शिपरा होमस्टेमधून पहाटे ५.३० वाजता चेक आऊट केले आणि पुढच्या अर्धा तासात त्यांनी चेरापुंजीकडे ट्रेक करण्यास सुरूवात केली. सोनमचे तीन साथीदार जवळच राहत होते, त्यांनी देखील याच वेळेला चेक आऊट केले. जवळपास सकाळी १० वाजता सोनम आणि राजा यांनी २००० पावलांची चढाई पूर्ण केली जेथे त्यांची भेट आनंद कुर्मी, आकाश राजपूत आणि विशाल चौहान या तीन आरोपींशी झाली.












