विशेष लेख:
मराठी साहित्य संमेलने आणि सद्यस्थिती
मराठी भाषिकांची अनेक वर्षांपासून मराठी साहित्य संमेलने मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी होत आहेत. या साहित्य संमेलनाचा आरंभ न्यायमूर्ती रानडे यांनी लोकवादीच्या सहकार्याने १८७८ मध्ये ग्रंथकारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने केला… आणि११ मे १८७८ मध्ये पुण्यातल्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरविले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे हेच होते.
साहित्य संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलने, प्रादेशिक साहित्य संमेलने, प्रांतिक, उपनगरीय, शारदीय, वासंती, महिला साहित्य संमेलने, बालकुमारांची साहित्य संमेलने, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित, आंबेडकरवादी, विमुक्त भटक्यांची, आदिवासी साहित्य संमेलने आदी नाना प्रकारा
ची मराठी भाषिकांची साहित्य संमेलने मोठ्या संख्येने व उत्साहाने होत आलीत. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. १९१२मध्ये अकोला येथे सुरू झालेल्या संमेलनात अधिकृत घटना निर्माण केली गेली. त्यानंतर १९६१ मध्ये ग्वालियरच्या संमेलनात मराठी साहित्य मंडळ नावाची संस्था उदयास आली. अध्यक्षाच्या निवडीचे वेगवेगळे नियम आतापर्यंत अस्तित्वात आलेले आहेत. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जेवढे सदस्य आहेत, त्यांच्या मार्फतच अध्यक्षाची निवड केली जाते.
खरे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती व्हायला खूप मोठा कालावधी जावा लागला. वर्णव्यवस्था आणि धार्मिक ग्रंथांच्या अमलात असलेल्या जाचक बंधनांमुळे शिक्षणप्रसार आणि परिवर्तनाच्या विचाराने गर्भधारणा केलेली नव्हती. ब्राह्मणेतरच नव्हे, ब्राह्मण स्त्रियांनादेखील शिक्षणाचा अधिकार नव्हता. व्यवस्थेचे उल्लंघन करणे हा गंभीर गुन्हा समजला जात होता. मग शिक्षणच नाही तर साहित्यनिर्मिती कशी होणार? जे लिहीत होते ते परंपरानिष्ठ होते.
ब्रिटिशांच्या आगमनानंतर काहीसा बदल झाला. खरा बदल व्हायला लागला तो भारतीय संविधान लागू झाल्यानंतर. पण तळागाळातली माणसे लिहायला लागली. त्यांनी पारंपरिक मूल्ये झिडकारून वास्तवाला साहित्यात प्रतिष्ठा मिळवून द्यायला आरंभ केला. मात्र प्रस्थापितांनी दखल घेतलीच नाही, उलट टीकास्त्रे सोडण्याला प्राधान्य दिले. त्यांची वृत्तपत्रे आणि नियतकालीकांमध्ये नवोदित, उपेक्षितांच्या साहित्याला स्थान देण्यात येत नव्हते. त्यांना साहित्य संमेलनामध्ये आमंत्रित केले जात नव्हते. अशा स्थितीत झिडकारलेल्या समूहातून अनियतकालिके, नियतकालिके यायला लागली. गरजेतून त्यांची वेगळी साहित्य संमेलने व्हायला लागली. यातूनच तळागाळातल्या साहित्यिकांनी स्वबळावर आपली उंची वाढवली. सर्वसामान्यांच्या जगण्याला साहित्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा मिळवून दिली.
उत्तरोत्तर साहित्यनिर्मिती आणि छोटीमोठी साहित्य संमेलने होत राहिली. हे सगळेकाही स्वानंदासाठी वा मनोरंजनासाठी होत नव्हते. हे लेखन आणि ही अशी संमेलने उद्देशपूर्ण असायची, गरज ही प्रेरणास्थानी असायची. ही मंडळी साहित्याच्या माध्यमातून गंभीर प्रश्न मांडायची, आपले विदारक जगणे शब्दबद्ध करायची, आपली हिरावलेली अस्मिता उजेडात आणायची. या साहित्यात केवळ जगण्यालाच प्राधान्य नव्हते, तर त्यात विद्रोह असायचा, करुणा असायची आणि माणुसकीची मूल्ये असायची. प्रस्थापित साहित्य यांत कुठेच नव्ह्ते. म्हणूनच तळागाळातले साहित्यिक आणि त्यांच्या निर्मितीला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकले.
… पण नंतरच्या काळात पूर्वमूल्ये पार बदलून गेली. हळूहळू गांभीर्य लुप्त होण्याच्या अनिष्ट मार्गावर आरूढ झाले. साहित्यिकांतली विचारमूल्ये आणि साहित्यातले सामाजिक भान वाळवीशी नाते सांगायला लागले. बहुसंख्य साहित्यिक हे प्रचारकाच्या भूमिकेत शिरले. साहित्य संमेलनांना उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले. कुणाला आमंत्रित करायचे, कुणाला टाळायचे जाणीवपूर्वक ठरायला लागले. कुणाकुणाला पुरस्कार द्यायचे, कुणाकुणाला टाळायचे हे निश्चित व्हायला लागले. प्रसारमाध्यमांच्या भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात गुंतल्या. एकूणच साहित्यिक प्रेरणा, प्रारंभीची साहित्यिक मूल्ये आणि साहित्य संमेलने ही सगळीच ऊर्जास्थळे कोमात गेल्यागत वाटायला लागलीत. त्यामुळे समाजजीवनातून साहित्य, साहित्यिक आणि साहित्य संमेलनांकडे तितकेसे गंभीरपणे बघितले जात नाही. दुसरे असे की, वर्णव्यवस्थेची विभिन्न रुपे साहित्याच्या नसानसांमध्ये शिरलीत ही साहित्यिक आणि एकूणच समाजजीवनासाठी अतिशय गंभीर बाब आहे असेच म्हणण्याची अप्रिय आणि वाईट वेळ येऊन ठेपलेली आहे.
जगात अतिशय दमदार पुस्तके प्रकाशित होतात, ती लोकप्रिय होतात. होणाऱ्या संमेलनांकडेही गंभीरपणे बघितले जाते. तसे काही आपल्याकडे का होऊ नये? साहित्य संमेलनातून साहित्याची आणि नवीन विचाराची उधळण झाली पाहिजे, नवीन दिशा,नवे प्रवाह उदयास आले पाहिजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यापुढील पाऊले उचलली गेली पाहिजे, मराठी भाषेची मरगळ झटकून; मराठी भाषा नवीन ताकदीने पुढे आली पाहिजे, मराठीचा जागर सर्वत्र आणि सर्वकालीन झाला पाहिजे. एवढीच अपेक्षा!!!…
प्रा.डाॅ. विजय जाधव
राजस्थान महाविद्यालय, वाशीम
संपर्क: ९८८१५२७६६०
●●●












