वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वाशिम जिल्ह्यात जनतेला संबोधित करताना त्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. एकूण 20 हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रु अनुदान दिले जाते.
यापूर्वी 17 वा हप्ता 18 जून रोजी वितरित करण्यात आला होता. या नवीन हप्त्यांतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये थेट पाठवले जाणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी क्षेत्राला बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
9.4 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार
देशभरातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली आहे. या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. विशेषत: शेतीतून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
लाभार्थी यादीतील नाव कसं तपासावे?
तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही? हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन लाभार्थ्यांची यादी पाहू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडल्यानंतर रिपोर्टवर क्लिक करा. तुम्हाला तुमचे नाव दिसून येईल.
नाव नसेल तर काय करावे?
जर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ मिळवू शकता. लक्षात ठेवा ही योजना फक्त पात्र शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे अचूकपणे सबमिट करा.












