वाशिम, (दि.१७ सप्टेंबर,२०२५): विश्वकर्मा जयंती व हैद्राबाद मुक्ती दिनाच्या औचित्यावर मध्यप्रदेशातील धार येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी ‘आदी कर्मयोगी’, ‘सुमन चॅटबॉट’ आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभ वितरण करण्यात आले. याचे ऑनलाईन पद्धतीने प्रसारण करण्यात आले.
या अभियानाचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, मोफत तपासणी व उपचार सेवांचा लाभ घेऊन स्वतःचे आरोग्य सशक्त करावे, असे मागणे मागत पंतप्रधान यांनी महिलांना भावनिक आवाहन केले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी ‘5F मंत्र’ (Form, Fiber, Factory, Fashion, Foreign) यावर भर देत स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “जे काही खरेदी कराल ते भारतीयांनी बनविलेलेच असले पाहिजे” असे सांगत त्यांनी ‘गर्व से कहो, ये स्वदेसी है’ हा नारा दिला व आपले भाषण समाप्त केले.
वाशिम जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा व प्राथमिक आरोग्य केंद्र आसेगाव येथे या अभियानाचा प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महिलांसाठी मोफत तपासणी व उपचार सेवा उपलब्ध राहणार आहेत.
जिल्हास्तरावर अभियानाचा शुभारंभ या अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. राजश्री देशमुख व महिला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिन मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लोणकर, डॉ. अविनाश पुरी, डॉ. अविनाश झरे, डॉ. पराग राठोड, डॉ. विजय काळे, डॉ. महेशचंद्र चापे, डॉ.मोबीन खान आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय शिबिरात क्षयरुग्णांना निक्षय मित्रांच्या माध्यमातून पोषण किट वाटप, सिकलसेल रुग्णांना ओळखपत्र वितरण करण्यात आले. महिलांना हिमोग्लोबिन, नेत्र, सिकलसेल व एनसीडी तपासणीसह एचआयव्ही मार्गदर्शन देण्यात आले. तसेच रक्तदान, नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अभियान कालावधीत महिलांसाठी खालील तपासण्या व सेवा उपलब्ध राहणार आहेत :
रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत तपासणी
स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी
गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी
हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी
सिकलसेल, कुपोषण व रक्तक्षय तपासणी
निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन












