निसर्गाचा कोप, शेतकऱ्यांचे दु:ख – मदतीसाठी अमोल अवताडे आघाडीवर
रिसोड तालुक्यातील शेतकरी आज अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. संततधार पाऊस, अवकाळी वादळे, गारपीटींनी खरीप पिके उध्वस्त केली. शेतकऱ्यांच्या ओठांवर उपासमारीचे सावट आहे आणि डोळ्यांत फक्त अश्रू. पण शासन-प्रशासनाच्या गजबजलेल्या दालनात या अश्रूंना किंमत नाही.
या बिकट प्रसंगात सामाजिक कार्यकर्ते अमोल अवताडे यांनी शेतकऱ्यांचा आवाज बनून प्रशासनापुढे ठाम मागणी लावली आहे – “तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, कर्जाला स्थगिती द्या, विशेष पॅकेज जाहीर करा. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारतील.”
आज प्रश्न फक्त पिकांचा नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. शेतकरी रोज सकाळी शेतात जातो, मातीला घामाने भिजवतो, पण शेवटी त्याला मिळते ती कर्जाची पावती आणि उपासमारीची वेळ. शासनाने अजूनही टाळाटाळ केली, तर या शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावरून उठणाऱ्या चळवळीत रुपांतर होणार हे निश्चित.
अमोल अवताडे यांनी दिलेला इशारा हा केवळ शब्दांचा नाही, तर शेतकऱ्यांच्या मनात पेटलेल्या असंतोषाचा आवाज आहे. आज शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर उद्या आंदोलनाच्या ज्वाळा पेटल्या शिवाय राहणार नाहीत. प्रशासनाने या आगीकडे दुर्लक्ष केले, तर त्याची राख दिल्ली-मुंबईपर्यंत उडाल्याशिवाय राहणार नाही.
👉 शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना ही केवळ सहानुभूतीची नाही तर कृतीची मागणी करत आहे. सरकारने आजच निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरलेला शेतकरी कोणत्याही सत्तेला खाली खेचू शकतो, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे.












