लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. मनाविरुद्ध झालेलं किती दिवस टिकणार यावर घटस्फोट घेऊन वेगळं होणं हा एकमेव मार्ग असल्याचं नंदिनी जीवाला सांगते. खरंतर, जीवाच्या स्वभावाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतलेला असतो.
पार्थ-काव्यामध्ये देखील अशाचप्रकारे वाद होत असतात. काव्या वकिलांना फोन करून परस्पर घटस्फोटाचे पेपर्स तयार करून घेते. पण, ते वकील नेमके पार्थच्या ओळखीचे निघतात आणि काव्याचं सत्य नवऱ्यासमोर उघड होतं. शेवटी आता काहीही झालं तरी काव्याला या नात्यातून मुक्त करायचं असं पार्थ ठरवतो. परिस्थितीनुसार काव्याला तिची चूक उमगते आणि ती नवऱ्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे जीवा सुद्धा नंदिनीची माफी मागतो.
काव्या खास साबुदाण्याची खिचडी घेऊन पार्थच्या ऑफिसला पोहोचते. पण, पार्थ ती खिचडी खाण्यास नकार देतो. नेहमी हसून-खेळून वागणाऱ्या पार्थचं तिरसट बोलणं ऐकून काव्याला अश्रू अनावर होतात. मात्र, आता मालिकेत या दोन्ही जोडप्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात होणार आहे.












