‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयंत-जान्हवीच्या घरी सशाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या सशाला जानू प्रेमाने ‘बबुच्का’ म्हणत असते. दिवसेंदिवस जान्हवीला या सशाचा लळा लागतो. सशाबरोबर खेळणं, त्याला गाजर-कोबी भरवणं या सगळ्या गोष्टी जान्हवी मोठ्या आवडीने करत असते.
मात्र, जयंत पहिल्यापासून पझेसिव्ह असल्याने जान्हवीने सशाची काळजी घेणंही त्याला पटत नसतं. काहीही करून बबुच्काला जानूपासून लांब करायचं असं जयंत ठरवतो आणि जयंतच्या याच विकृतीमुळे त्यांच्या घरात एक मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
बबुच्का ससा घरात कुठेही दिसत नसल्याचं पाहून जान्हवी बिथरून जाते. ती खूप घाबरते आणि संपूर्ण घरात त्याला शोधू लागते. इतक्यात जयंत तिच्याकडे काय झालंय याची विचारपूस करतो पण, जान्हवी काहीच उत्तर देत नाही कारण, तिला फक्त सशाला पाहायचं असतं…इतर कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत ती नसते.













