मुंबईतील सर जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय डॉक्टरने शिवडी-न्हावा सी-लिंक अटल सेतूवरून कथितपणे उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी घरी येत असल्याचे आईला सांगितल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांनी पुलवरून उडी मारली, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली. तसेच त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईच्या कळंबोली येथील रहिवासी असलेले डॉ. ओमकार कवितके यांना अखेरचे सोमवारी रात्री एका कार चालकाने पाहिले होते, त्यानेच पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवितके यांनी त्यांची होंडा अमेझ कार नवी मुंबी-मुंबई मार्गावरील सी-लिंकवर थांबवली आणि पुलाच्या रेलिंगवरून उडी घेतली.
जेव्हा नवी मुंबईतील उलवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळावर पोहचले तेव्हा त्यांना कार आणि त्यामध्ये एक आयफोन आढळून आला. या फोनमधील क्रमांकावर कॉल करून त्यांनी कार मालकाची ओळख पटवली. मिळालेल्या माहितीनुसार, कविताके हे गेल्या सहा वर्षांपासून मुंबईतील रुग्णालयात काम करत होते. दरम्यान या प्रकाराबद्दल कविताके यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे आणि डॉक्टरांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.












