सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उद्यानात फिरणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह आणि विनासंमती चित्रीकरण करून ते व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याप्रकरणी बंगळुरूतील इन्स्टाग्राम पेजवर कारवाई करण्यात आली आहे. इंडिया वॉक १ केएम या पेजवरून ट्रॅव्हल आणि स्ट्रिट फॅशनच्या नावाखाली महिलांचे चुकीच्या पद्धतीने चित्रीत केलेले व्हिडीओ शेअर केले जात होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर आता बंगळुरू पोलिसांनी सदर इन्स्टाग्राम पेज चालविणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, केआर पुरम परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय गुरदीप सिंगला अटक करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटला ११ हजार फॉलोअर्स होते. बंगळुरूतील चर्च स्ट्रिट आणि कोरमांगला या रहदारीच्या रस्त्यावरील अनेक महिलांचे व्हिडीओ चित्रीत करून या पेजवर शेअर करण्यात आले होते. सदर व्हिडीओ आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीत केल्यामुळे टीका होऊ लागली होती.
काही व्हिडीओंमध्ये कॅमेरा मागे येत असल्याचे दिसल्यामुळे काही महिला अस्वस्थ झाल्याचेही दिसत आहे. तरीही ते व्हिडीओ तसेच पोस्ट करण्यात आले होते. केवळ लाइक्स आणि व्ह्यूज वाढविण्यासाठी हा प्रकार केल्याचे आता पुढे आले आहे.












