खासदार शशी थरूर यांचा सध्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांशी संघर्ष चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. शशी थरूर यांनी वारंवार सरकारबाबत घेतलेल्या मवाळ भूमिका व पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांचे सहकारी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा थरूर यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना सहकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. थरूर यांच्या आणीबाणीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते माणिकम टागोर यांनी आक्षेप नोंदवला आहे.
खासदार माणिकम टागोर यांनी गुरुवारी त्यांचे सहकारी थरूर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. शशी थरूर हे भाजपाच्या आणीबाणीसंदर्भातील भूमिकेशी सहमत आहेत का? असा प्रश्न देखील टागोर यांनी उपस्थित केला आहे. थरूर यांनी ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’ या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेसाठी लिहिलेल्या लेखात आणीबाणीचा उल्लेख करताना हा केवळ काळा अध्याय म्हणून न पाहता त्यातील गुंतागुंतीचे व वेगवेगळे पैलू, त्यातून मिळालेले धडे समजून घेणं आवश्यक असल्याचं मत नोंदवलं आहे.
“पोपटपंची जंगलात चांगली वाटते, राजकारणात नाही”
टागोर यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जेव्हा तुमचा एखादा सहकारी भाजपाचं म्हणणं पुढे रेटतो, शब्दशः त्यांची उजळणी करतो तेव्हा तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटणं सहाजिक आहे. पक्षी आता पोपट बनलाय का? पोपटपंची जंगलात चांगली वाटते, राजकारणात नाही.” टागोर यांनी कुठेही थरूर यांचं नाव नमूद केलेलं नसलं तरी त्यांचा रोख थरूर यांच्याकडेच असल्याचं स्पष्ट जाणवत आहे.
“शिस्त लावण्यासाठी केलेले उपाय क्रूरतेचा कळस गाठतात”, थरूर यांचं आणीबाणीबद्दलचं मत
थरूर यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात तत्कालीन सरकारने केलेल्या अतिरेकांची आठवण करून दिली आहे. थरूर यांनी म्हटलं आहे की व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी केलेले उपाय कधीकधी क्रूरतेचा कळस गाठतात.
“इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी सक्तीच्या नसबंदी मोहिमा राबवल्या. ग्रामीण भागातील लोकांची बळजबरीने नसबंदी केली. त्यासाठी अनेक ठिकाणी हिंसाचारही केला. शहरांमधील झोपडपट्ट्या हटवण्यासाठी निर्दयीपणे कारवाया केल्या. हजारो नागरिकांना बेघर केलं. लोकांच्या झोपड्या पाडताना त्यांना दुसरीकडे पक्की घरं देणं, तिथे त्यांना कामधंदा देण्याचा पुरेसा विचार केला गेला नाही.”
आणीबाणी आपल्याला सावध राहण्याचा इशारा देते : थरूर
थरूर यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे की “एककेंद्री सत्ता म्हणजेच सत्तेचा एकहाती वापर, विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी दडपशाहीचा वापर आणि संवैधानिक मर्यादा ओलांडण्याची प्रवृत्ती भविष्यात नव्या स्वरुपात पुन्हा उगम पावू शकतात. या गोष्टी राष्ट्रीय हिताच्या नावाखाली उचित ठरवल्या जातात. मात्र, आणीबाणी आपल्याला सावध राहण्याचा इशारा देते. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सजग असायला हवं.”












