पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा प्रारुप विकास आराखडा अंतिम करताना कोणत्याही भूमिपुत्रावर अन्याय होणार नाही. गोरगरिबांची घरे बाधित होणार नाहीत. देवस्थानच्या जमिनींवर पडलेल्या आरक्षणांची तपासणी करुन रद्द केली जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. १४ जुलैपर्यंत हरकती-सूचना मांडता येणार आहेत. भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, डीपी तयार करताना चुकीच्या पद्धतीने केला आहे. बांधकाम परवाने घेतलेल्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केले आणि त्या ठिकाणी कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकले आहे. एचसीएमटीआर मधील साडेतीन किलोमीटरवर लिनिअर गार्डन विकसित केले आहे. पण, प्रारुप विकास आराखड्यामध्ये त्याचा विचार केलेला नाही. आहे तसे आरक्षण ठेवले आहे. थेरगाव येथेसुद्धा हजारो नागरिक बेघर होणार आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मंत्री यांना माहिती दिली. त्यामुळे मंत्री यांनी गोलगोल फिरवणारे उत्तर दिले. सभागृहाला अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. बांधकाम परवागनी घेतलेले आरक्षणे रद्द करावीत.












