सुनेने आपल्या सासूला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुनेने तिच्या आई बरोबर मिळून तिच्या सासूला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुरम भागातून घरगुती हिंसाचाराची ही घटना समोर आली आहे.
व्हिडीओत काय दिसतं आहे?
व्हायरल व्हिडीओत हे स्पष्ट दिसतं आहे की सून तिच्या सासूला पायऱ्यांवरुन खेचताना, फरपटताना दिसते आहे. केस ओढताना मारहाण करताना दिसते आहे. या व्हिडीओबाबत नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना १ जुलैची आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या आकांक्षा नावाच्या मुलीने आणि तिच्या आईने सासूचा पाठलाग करुन तिला खाली पाडलं. सासू स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. मात्र सून तिच्या सासूला मारते आहे, त्यात तिची आईही तिला साथ देते आहे हे दिसून येतं आहे.
पीडित महिलेचा आरोप काय?
पीडित महिलेचा आरोप आहे की या घटनेनंतर ती पोलिसांकडे गेली. मात्र तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. आकांक्षाचे वडील दिल्ली पोलीसांमध्ये पोलीस उप निरीक्षक आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मात्र या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विषय चर्चेला आला. त्यानंतर आकांक्षा आणि तिच्या आईच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी पुढील तपास करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
आकांक्षाच्या सासूची तक्रार पोलिसांनी सहा दिवस नोंदवून घेतली नव्हती. पीडिता सासू सुदेश देवी आणि त्यांचे पती यांनी म्हटलं आहे की आमची तक्रार सहा दिवस नोंदवून घेतली नाही. सासूला सुनेने आणि तिच्या आईने मारहाण केली आणि त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर कारवाई झाली आहे.












