टॅक्सी चालकांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी २४ वर्षांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अजय लांबा या सीरियल किलरला अटक केली आहे. त्याच्यावर चार हत्यांचे गुन्हे आणि दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. मागच्या दोन दशकांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी २४ वर्षांनी त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्याबाबत माहितीही दिली आहे.
अजय लांबावर साखळी हत्येचे गुन्हे
अजय लांबा आणि त्याचे सहकारी टॅक्सी बुक करायचे. त्या टॅक्सीने उत्तराखंडला जायचे. त्याला गुंगीचं किंवा कुठलंही औषध देऊन बेशुद्ध करायचे आणि तो टॅक्सी चालक बेशुद्ध झाला की त्याची गळा दाबून हत्या करायचे. त्याचा मृतदेह डोंगर दऱ्यांमध्ये फेकून द्यायचे आणि त्याची टॅक्सी तस्करी करुन नेपाळला विकायचे. या प्रकरणातल्या सीरियल किलरला पोलिसांनी २४ वर्षांनी अटक केली.
काय केलं होतं अजय लांबाने?
अजय लांबा हा खुनी, दरोडेखोर हा चार हत्यांमध्ये सहभागी आहे. दिल्ली उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी २००१ मध्ये त्याने हे गुन्हे केले होते. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. टॅक्सी हायर करायची, त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करायची आणि मग त्याची टॅक्सी आणि त्याचं सगळं सामान लुटून फरार होत असे. या प्रकरणात आम्ही त्याचा शोध घेत होतो, आता त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त आदित्य गौतम यांनी दिली. आदित्य गौतम पुढे म्हणाले की अजय लांबा आणि त्याचे सहकारी इतर हत्यांमध्येही सहभागी असावेत अशा संशय आम्हाला आहे. आम्ही त्या अनुषंगाने चौकशी करतो आहेत. अजय लांबाने सहावीत असताना दिल्ली सोडलं. त्यानंतर तो उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी राहू लागला. त्याला या हत्यांमध्ये दिली आणि धीरेंद्र नेगी या दोघांनी साथ दिली होती. अजय लांबाच्या विरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी अजयबाबत अजून काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लांबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा शोध सुरु होताच. दरम्यान पोलिसांना हे कळलं की २००८ ते २०१८ या कालावधीत तो नेपळाला जाऊन राहिला आहे. त्यानंतर तो देहरादून या ठिकाणी पोहचला. २०२० मध्ये तो गांजा पुरवणाऱ्या गँगमध्ये सहभागी झाला होता. आता २४ वर्षांनी त्याला अटक करण्यात आली आहे.












