हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा लहान भाऊ निहल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने सादर केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ४६ वर्षीय नेहल मोदीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.
नेहल मोदीला अटक केल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. १७ जुलै रोजी नेहल मोदीला न्यायालयात सादर केले जाईल, तिथे त्याच्याकडून जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र अमेरिकेतील सरकारी वकिल या जामिनाला विरोध करतील, असेही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
भारताकडून दोन प्रकरणात प्रत्यार्पणाची मागणी केली गेली आहे. पीएमएले कायद्याच्या कलम ३ नुसार एक मनी लाँडरींगचे प्रकरण आहे. तर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप नेहल मोदीवर आहे.












