-0.6 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘आपले सत्य व आपला इतिहास’, ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक; रणबीर कपूर श्रीरामाच्या, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत

मुंबई : ‘आपले सत्य व आपला इतिहास’ म्हणत नमित मल्होत्रा प्रस्तुत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाची पहिवहिली झलक समोर आली आहे. जबरदस्त व्हीएफएक्सचा थरार आणि मनाचा ठाव घेणारे संगीत अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहे. तारांकित कलाकार व तंत्रज्ञ, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हीएफएक्स टीम आणि सर्वच तांत्रिक बाजूंनी भव्य असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

पौराणिक काळातील राम विरुद्ध रावणामधील संघर्षाची अजरामर कथा मांडणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक एकाच वेळी भारतातील ९ शहरात गुरूवार, ३ जुलै रोजी दाखविण्यात आली. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या शहरांमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात हा कार्यक्रम पार पडला. या चित्रपटाची पहिलीवहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि चित्रपटगृहाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये विविध वयोगटातील प्रेक्षकांसह महाविद्यालयीन तरुण – तरुणींचा मोठा समावेश होता. तर लोअर परळ येथील पीव्हीआर चित्रपटगृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांनी हजेरी लावली होती. विशेष बाब म्हणजे न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर भव्य बिलबोर्ड्सद्वारे या चित्रपटाची पहिली झलक दाखविण्यात आली.

‘रामायण : द इंट्रोडक्शन’ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. याशिवाय, रावणाची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता यश साकारत असल्याने एकूणच या चित्रपटाविषयी चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सनी देओलने आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच पौराणिक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय, हिंदी दूरचित्रवाहिनीवर लोकप्रिय असलेला अभिनेता रवी दुबे या चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. तर मनाचा ठाव घेणारे संगीत हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी दिले आहे. विशेष बाब म्हणजे सिनेमॅटोग्राफीची धुरा मराठमोळ्या महेश लिमये यांनी सांभाळली आहे. तसेच पंकज कुमार हेही सिनेमॅटोग्राफर आहेत. ‘रामायण’ चित्रपटात ऑस्कर पुरस्कार विजेते तंत्रज्ञ, हॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते आणि भारतातील दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, हे सर्व मिळून भारतीय संस्कृतीत रुजलेली रामायणाची महान गाथा एका आधुनिक सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणत आहेत. तर ‘दंगल’, ‘छिछोरे’सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली, नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओज व आठ वेळा ऑस्कर विजेते डीएनइजी व्हीएफएक्स स्टुडिओ, तसेच यश यांच्या मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘आपली वैभवशाली संस्कृती व वारसा जागतिक स्तरावर नेताना प्रचंड अभिमान व आनंद वाटतो आहे. रामायणाची कथा आपल्यात खोल रुजलेली आहे. ही कथा केवळ पौराणिक नसून एक शाश्वत सत्य आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा आत्मा सांभाळून ‘रामायण’ जागतिक स्तरावर भव्य स्वरूपात नेणे मी माझे कर्तव्य व सन्मान समजतो’, अशी भावना दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी व्यक्त केली. तर नमित मल्होत्रा म्हणाले की, ‘रामायण हा केवळ एक चित्रपट नाही, तर हा एक सांस्कृतिक वारसा आहे. आपण आपली परंपरा जागतिक स्तरावर नव्या सादरीकरणाच्या माध्यमातून आणत आहोत. आतापर्यंत रामायण विविध प्रकारे पाहिले गेले आहे, पण आता आपण त्याला एका भव्य आणि प्रगत स्वरूपात आणत आहोत, यामुळे जागतिक चित्रपटसृष्टीच्या पटलावर भारताची विशेष ओळख निर्माण होईल’.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in