मुंबईत असंख्य लोक आपल्या भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. काहीजण उच्च शिक्षणासाठी, काही लोक नोकरीसाठी तर अनेकजण करिअर घडवण्यासाठी मुंबईत येऊन पोहोचतात. पण, या मायानगरीत राहणं वाटतं तेवढं सोप नाहीये. मुंबईत लोकांना जसे चांगले अनुभव येतात तसे वाईटही अनुभव येतात.
मराठी मालिकाविश्वात काम करणाऱ्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिला मुंबईत राहण्यासाठी कोणीच भाड्याचं घर देत नाहीये असा मुद्दा उपस्थित केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा कातुर्डे. मुंबईत भाड्याने राहायला घर शोधताना नेमक्या काय अडचणी उद्भवल्या? याचा खुलासा पूजाने सविस्तरपणे शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
पूजा कातुर्डेची पोस्ट
माझ्या जुन्या मालकाने फ्लॅट विकला. त्यानंतर नवीन घराच्या शोधात निघाले. ‘हाऊसिंग’, ’99 एकर्स’, परिसरातील ब्रोकर्स सगळीकडे फोन केले. फ्लॅट पाहिले…वेळ, एनर्जी सगळं दिलं. शेवटी १-२ फ्लॅट्स फायनल केले…पण काय झालं? संबंधित घरमालक माहिती घेतो आणि अचानक उत्तर येतं… ‘ओह नो अभिनेत्री नको आहे…’ याचा अर्थ महिला कलाकार असल्यामुळे घर नाकारलं जातं?
दुसऱ्या ठिकाणी घर पाहण्यासाठी गेले, तिथे दुसऱ्या घरमालकानेही ‘हो’ म्हटलं होतं पण, जेव्हा बिल्डरने डिटेल्स मागवले तेव्हा बिल्डर म्हणतो, ‘सिंगल आहे? अभिनेत्री आहे? मग नाहीच!’ अजून एके ठिकाणी सोसायटी कमिटीची मिटींग सुरू होणार होती. या मिटींगमध्ये काही बुद्धिमान सदस्यांना माझं ‘Actor’ असणं ही समस्या वाटली. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? अभिनेत्री म्हणजे गोंधळ? सिंगल मुलगी म्हणजे संशयास्पद? तुम्ही आम्हाला फक्त टीव्हीवर, स्क्रीनवर पाहता पण, खऱ्या आयुष्यात आम्हाला रिजेक्ट करता कारण काय तर आम्ही ‘Actor’ आहोत.
तुमच्या सोसायटीत पती-पत्नी एकमेकांवर ओरडतात, केसेस सुद्धा चालू असतात…पण सगळ्यांना त्रास होतोय फक्त कलाकारांचा? काय भोंदू विचार आहेत हे? तुमच्या सोसायटीमध्ये मुली नाहीत का? कोणी स्वत:चं करिअर घडवणारं राहिलं नाही का? मुंबईसारख्या शहरातही ही परिस्थिती आहे? याची लाज वाटत नाही का? मग आम्ही कुठे राहावं? काय वाटलं तुम्हाला…कलाकार म्हणजे नाचणारे-गाणारे म्हणून गोंधळ होणार असं काहीच नाहीये. कलाकार म्हणजे बदमाश, चारित्र्यहीन अशी प्रतिमा या समाजात निर्माण झाली आहे.
घरमालक म्हणतात ‘महिला कलाकार’ नको आणि बिल्डर म्हणतो ‘सिंगल’ मुलगी नको. तुम्ही कोण आहात ठरवणारे आम्ही कुठे राहायचं ते? घर विकायचंय, भाड्याने द्यायचंय…पण जर्जमेंटसह… तुमच्या घरात सगळे व्यवस्थित लग्न करून, नोकरी करूनच राहत आहेत का? त्यांना लाज वाटली पाहिजे असा भेदभाव करताना…मी घर शोधतेय…आणि घर नाकारलं जातं कारण मी स्वावलंबी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वप्नांवर जगते. मग सांगा…लग्न करून येऊ? तेव्हा घर देणार का मग?
आज मी अभिनेत्री आहे. सिंगल आहे…स्वतंत्र आहे…कोणाकडे भीक मागत नाहीये…पण, घर हवं आहे दया नको!
दरम्यान, पूजाने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय अभिनेत्री पूजा कातुर्डेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर पूजाने आजवर ‘हृदयी प्रीत जागते’, ‘सांग तू आहेस का’, ‘गुरुदेव दत्त’, ‘विठू माऊली’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय अभिनेत्री ‘गेमाडपंथी’ या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.












