गुजरात उच्च न्यायालयातील व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक वरिष्ठ वकील बिअर पिताना दिसून आल्याचा प्रकार समोर आला आहे . या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून या वरिष्ठ वकिलाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मंळवारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान हे वरिष्ठ वकील भास्कर तन्ना बुधवारी न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्यासमोर हजर झाले आणि त्यांनी याबद्दल बिनशर्त माफी मागीतली आहे. तसेच हा १५ सेकंदांचा व्हिडीओ असून ही घटना ते त्यांच्या बारीची वाट पाहत असताना आणि कोणत्याही सुनावणीचा भाग नव्हते तेव्हा घडल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायमूर्ती ए. एस सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर टी वच्छानी यांच्या बेंचने रजिस्ट्री यांना वरिष्ठ वकिलाच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तसेच वरिष्ठ वकिलाचे वर्तन हे अपमानजनक आणि भयावय होते असेही म्हटले. ही घटना न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या न्यायालयात झाली होती, ज्यामध्ये हे वकिल व्हर्च्युअल पद्धतीने हजर झाले होते आणि चालू व्हिडीओ कॉलमध्ये बिअर पिताना आणि फोनवर बोलताना आढळले होते.
मागितली बिनशर्त माफी
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार तन्ना यांनी न्यायालयाला सांगितले की, स्क्रीनवर जे काही आले ते सुनावणी दरम्यान आले नाही आणि तेव्हा प्रकरणाची सुनावणी सुरू नव्हती, मी माझे कंप्युटर बंद करत होतो. मात्र १५ सेकंदांची क्लिप आली. मला याचा पश्चाताप आहे आणि मी काल डिव्हीजन बेंचच्या समोर बिनशर्त माफी मागीतली आहे आणि मी या संस्थेचा सन्मान करतो म्हणून मी हे करत आहे. कधी-कधी तांत्रिकदृष्ट्या चूक होऊन जाते. मी माझ्या बारीची वाट पाहत होतो आणि मला सांगण्यात आलं होतं की ती सुट्टीच्या नंतर येईल.’
वरिष्ठ वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमुर्ती भट्ट म्हणाले की अशा घटना व्हायला नकोत. न्यायमूर्ती भट्ट म्हणाले म्हणाले की, मला यामध्ये कोणताही संशय नाही की तुमच्याकडून जाणूनबुजून असे तागी करण्याचा प्रयत्न झालेला नाही, मात्र असे व्हायला नको होते. हे चांगले नाही आणि यामुळे समाजात संदेश जातो. फक्त तुमच्या प्रकरणातच नाही, तर अशा घटना दररोज होतात.”
मंगळवारी अवमानाची कारवाई सुरू करण्याचा आदेश जारी करण्यात आल्यानंतर तन्ना यांनी वैयक्तिकरित्या न्यायमूर्ती सुपेहिया आणि न्यायमूर्ती वच्छानी यांच्या बेंचपुढे हजर झाले आणि बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाने म्हटले की, तुम्ही जे काही सादर करू इच्छित आहात ते पुढील सुनावणीमध्ये ते करू शकता. आम्ही कारवाई दरम्यान तुमच्या सादर केलेल्या गोष्टींवर विचार करू, अट ही आहे की ते लिखित स्वरुपात असावे.
गुजरात उच्च न्यायालयात व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक वरिष्ठ वकिल हे बिअरच्या मगने ड्रिंक्स घेताना दिसून आले होते. यानंतर न्यायालयाने अवमानाची कारवाई सुरू केली आहे.












