पनवेल – कामोठे उपनगरात गेल्या नऊ दिवसांमध्ये तीन जेष्ठ नागरिकांची लुटमार पादचारी चोरट्यांनी केली आहे. आतापर्यंत तीन जेष्ठांना लुटीच्या घटनेतून जेष्ठ नागरिकांची साडेतीन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लुट झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरम्यान कामोठे पोलिसांनी संबंधित लुटीतील संशयीतांचे छायाचित्र उपनगरांमधील चौकात लावून नागरिकांना या चोरट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२४ जुन आणि २५ जून या दिवसांमध्ये प्रत्येकी एक घटना घडली आहे. तसेच मंगळवारी (१ जुलै) दुपारी पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सूमारास सेक्टर ११ येथील श्री कृष्णा अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर मुलीकडे राहण्यासाठी आलेल्या एका ८० वर्षी वृद्धेला चोरट्यांनी रस्त्यात गाठले. या वृद्ध महिलेला शेजारी वस्तूंचे वाटप होत असल्याचे आमिष दाखवून त्यांची लुट केली. या लुटीमध्ये एक लाख रुपयांची गळ्यातील बोरमाळ आणि हातामधील पैशांचे पाकीट लुटले.
तसेच २४ जूनच्या घटनेत सायंकाळी पावणेपाच वाजता ५८ वर्षीय महिला भाजी खऱेदीसाठी सेक्टर ३५ येथील रस्त्यावरून पायी चालत होत्या. संशयीत चोरट्याने शेठला मुलगा झाल्याने रेशन मोफत वाटप होत असल्याचा बहाणा करुन या महिलेसोबत चोरटा बोलू लागला. रेशन मिळण्यासाठी अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातले असे ९० हजार रुपयांचे दागीने काढून स्वताजवळील पिशवीत ठेवण्याचे सांगीतले. काही मिनिटांत शेटने अगोदर बिस्कीटांचे पुडे दिले असल्याचे सांगून पिडीत महिलेच्या हातामधील पिशवीतून हातचलाखीने दागीने काढून त्यामध्ये बिस्कीटचे पुडे ठेवले. यानंतर ते चोरटे चला चला म्हणत पुढे पळत जाऊन तेथून पळून गेले.












