अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याने २००० साली आलेल्या ‘रिफ्यूजी’ चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच २५ वर्षे झाली आहेत. त्यासह अभिनेत्याच्या अजून एका चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत आणि तो चित्रपट म्हणजे ‘सरकार’. अभिषेकसाठी हा चित्रपट खास आहे. कारण- त्यामधून त्याने पहिल्यांदाच त्याचे वडील व लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह काम केले होते.
अभिषेकने ‘सरकार’ला प्रदर्शित होऊन २० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘स्क्रीन’शी संवाद साधला. यावेळी त्याने या चित्रपटात त्याच्या वडिलांसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिषेकला या मुलाखतीमध्ये ” ‘सरकार’ आणि ‘बंटी और बबली’ हे चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली. त्यामध्ये तुझ्या वडिलांसह काम करण्याचा, त्यांच्याबरोबर पहिला सीन करण्याचा तुझा अनुभव कसा होता?” असा प्रश्न विचारण्यात आलेला.
अभिषेक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, ” ‘सरकार’ चित्रपटातून मी पहिल्यांदाच माझ्या वडिलांबरोबर काम केलं होतं. पण ‘बंटी और बबली’ हा चित्रपट ‘सरकार’च्या आधी प्रदर्शित झाला. आम्ही ‘सरकार’साठी सहा दिवस एकत्र काम केलं. वडिलांबरोबर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केलं तेव्हाचा अनुभव भयंकर होता; पण माझ्या यादरम्यानच्या खूप छान आठवणी आहेत. विशेषकरून आमचे दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांच्याबरोबर काम करताना मजा आली. ते माझे आवडते दिग्दर्शक आहेत आणि तो चित्रपटसुद्धा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे”.












