मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्या घराघरांत प्रसिद्ध झाल्या. बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत अभिनय करत उषा नाडकर्णींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
मराठीतील अनेक कलाकारांनी उषा नाडकर्णींबरोबर काम करतानाचे अनुभव किंवा काही किस्से सांगितले आहेत. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञाने ‘खुळता कळी खुलेना’ मालिकेबद्दलची आठवण शेअर केली. तसंच या मालिकेमधील एका सीनदरम्यान उषा नाडकर्णी अभिज्ञा भावेवर ओरडल्या होत्या, असा एक किस्सा अभिज्ञाने सांगितला आहे. नेमका काय आहे किस्सा?
याबद्दल अभिज्ञा असं म्हणाली, “माझे मालिकेत आऊ (उषा नाडकर्णी)बरोबरचे बऱ्यापैकी सीन होते. तर एक सीन होता, ज्यात मला खूप बोलायचं होतं आणि तो सीन लेखकाने अगदी नुकताच लिहून दिला होता. तर त्या सीनआधी मी रात्रीचं काम करून, सेटवरच झोपून मग पुन्हा दुसऱ्या दिवशी चित्रीकरण करत होते. त्यात बाकीचे सीनिअर कलाकार आदल्या दिवशी त्यांच्या वेळेत घरी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या शिफ्टसाठी आले.”












