सावंतवाडी : मालवण तालुक्यातील नांदोस सुतारवाडी येथील जंगलमय भागात सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंह थापा याचाच असल्याची माहिती त्याचा मावस भाऊ योग बहादूर छेत्री याने पोलिसांना दिली आहे. कौटुंबिक समस्येतून प्रदीप सिंह थापाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मृतदेहाची ओळख पटली
काल, शनिवारी नांदोस सुतारवाडी येथील जंगलात वडाच्या झाडाखाली एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला होता. मृतदेहाशेजारी निळ्या रंगाची हाफ पँट, पांढरी चप्पल, टी-शर्ट, मोबाईल, घड्याळ, ओळखपत्र आणि काही नोटा पोलिसांना सापडल्या होत्या. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हा मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंह थापा याचा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. या शोधमोहिमेदरम्यान प्रदीप सिंहचा मावस भाऊ योग बहादूर छेत्री हा वैभववाडी येथे राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी योग बहादूर छेत्रीशी संपर्क साधला होता.
आज योग बहादूर छेत्री मालवण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल, घड्याळ, कपडे आणि इतर वस्तू प्रदीप सिंह थापा यांच्या असल्याचे ओळखले आणि मृतदेह प्रदीप सिंहचाच असल्याची खात्री केली.












