आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत एक्स हँडलवर याचा एक फोटो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे हास्यविनोद करत संवाद साधताना दिसत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स हँडलवर या संवादाचे थेट प्रक्षेपणही काही वेळापूर्वी करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी शुभांशू शुक्ला यांना म्हणाले, “आज तुम्ही भलेही मातृभूमीपासून दूर आहात. पण तुम्ही प्रत्येक भारतीयांच्या मनात आहात. तुमच्या नावातच शुभ आहे आणि तुमचा हा प्रवास नव्या युगाचा शुभारंभही आहे.”
मिशन पायलट म्हणून शुभांशू शुक्ला या मोहिमेत काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर अमेरिकेचे मिशन कमांडर पेगी व्हिटमन, पोलंडचे मिशन तज्ज्ञ सावोस उझनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हेदेखील आहेत.
शुभांशू शुक्ला गुरूवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांनी हिंदीतून निवेदन दिले. ते म्हणाले, “तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी इथे सुखरुप पोहोचलो आहे. इथे उभे राहणे सोपे वाटत असले तरी तसे कठीण आहे. येत्या काही दिवसात इथल्या वातावरणाची मला सवय आहे. पुढील १४ दिवस आम्ही इथे अनेक संशोधन करणार आहोत. काही वेळापूर्वी ड्रॅगनमध्ये असताना मी तुम्हा सर्वांशी संवाद साधला होता. यापुढे मी रोज आपल्याशी बोलत राहिल. जय हिंद, जय भारत.”












