उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीत गुरूवारी (२६ जून) बस कोसळून भीषण अपघात झाला होता. या बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते. पार्थ सोनी या १० वर्षांच्या मुलाने अपघातात आपले पालक गमावले. हताशपणे बचावकार्य पाहत असलेल्या पार्थचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो भगवान बद्रीनाथला प्रार्थना करत घडलेल्या घटनेचा जाब विचारत आहे. हा हृदयद्रावक व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.
१० वर्षांचा पार्थ अलकनंदा नदीकडे पाहत म्हणतो, “देवा हे तू काय केलेस? आमची काय चूक होती? आम्ही तुझे भक्त होतो”. पार्थचे कुटुंब हे मध्यप्रदेशच्या राजगड येथील होते. पार्थ हा विशाल सोनी (४२) आणि गौरी सोनी (४१) यांचा एकुलता एक मुलगा असून तो या अपघातामधून वाचला. दरम्यान अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अजूनही आठ जण बेपत्ता आहेत.












