-0 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुर्ला मदर डेअरीची १३०० कोटींची जमीन अदानीला केवळ ५७.८६ कोटीत, ‘आपली लोक चळवळी’चा आरोप, न्यायालयात धाव घेणार

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील अनेक ठिकाणच्या जागा कवडीमोल दरात अदानी समुहाला दिल्या जात आहेत. कुर्ला मदर डेअरीच्या जागेची किंमत १३०० कोटी रुपये असताना ती केवळ ५७.८६ कोटी रुपयांना अदानीला धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आल्याचा आरोप ‘आपली लोक चळवळी’ने केला आहे. हा मोठा जमीन घोटाळा असल्याचा आरोप करीत ‘आपली लोक चळवळी’ने आता याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा विचार सुरू केला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांचे मुंबईत अन्यत्र पुनर्वसन केले जाणार आहे. भाडेतत्वावरील घरांच्या माध्यमातून त्यांना घरे दिली जाणार असून या घरांची बांधणी अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) केली जाणार आहे. त्यानुसार धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणची १२०० एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार डीआरपीला मुलुंडसह अन्य काही ठिकाणच्या जागा देण्यात आल्या आहेत. यात कुर्ल्यातील मदर डेअरीच्या २१ एकर जागेचा समावेश आहे. ही जागा डीआरपीला हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र ही जागा देण्यास कुर्लावासियांचा प्रचंड विरोध असून यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या जागेवर उद्यान साकारण्याची मागणी कुर्लावासियांची केली आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे काणाडोळा करीत सरकारने ही जागा डीआरपीला हस्तांतरित केली आहे. या जागेचा वापर आता एनएमडीपीएलकडून अपात्र धारावीकरांच्या घरबांधणीसाठी केला जाणार आहे. आता ही जागा कवडीमोल दरात अदानीला आंदण दिल्याचा आरोप करीत कुर्लावासीय आक्रमक झाले आहेत.

कुर्ल्यातील निवासी जागेचा दर १५ हजार रुपये प्रतिचौरस फूट असताना ही जमीन केवळ ६३२ रुपये प्रतिचौरस फूट दराने देण्यात आली आहे. आजघडीला बाजारभावानुसार या जमिनीची किंमत १३०० कोटी रुपये आहे. असे असताना ही जागा केवळ ५७.८६ कोटीत रुपयांत देण्यात आल्याचा आरोप ‘आपली लोक चळवळी’चे कार्यकर्ते किरण पैलवान यांनी केला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही जमीन डीआरपीकडे हस्तांतरित झाली असून ही जमीन डीआरपीच्या नावे राहणार आहे. जमिनीसाठी अदानीच्या कंपनीने पैसे भरले असून जागेचा वापर याच कंपनीकडून होणार आहे. यातून अदानीलाच फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

धारावीबाहेरील जागा रेडीरेकनरच्या २५ टक्के दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र बाजारभावानुसार १३०० कोटी रुपयांची जमीन ५७.८६ कोटी दरात देण्यात आली आहे. त्यास ‘आपली लोक चळवळ’ने आक्षेप घेतला आहे. निविदेमधील कोणत्या अटी-शर्तीनुसार अदानीच्या प्रकल्पासाठी कमी दरात जागा दिली याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने जनतेला द्यावे, अशी मागणीही पैलवान यांनी केली आहे. हा मोठा जमीन घोटाळा असून याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याविषयी एनएमडीपीएलकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in