भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भारतीय तरुण नोकरीसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व आखाती देशात जातात. उच्चशिक्षित तरुणांना पाश्चिमात्य देशांत, युरोपात चांगल्या नोकऱ्या मिळतात. मात्र, पुरेसं शिक्षण नसलेले तरुण मजुरी करण्यासाठी आखाती देशांचा मार्ग निवडतात. अलीकडच्या काळात भारतातून अनेक तरुण मजुरी करण्यासाठी इस्रायलला जाऊ लागले आहेत. मात्र, इस्रायलचा सध्या अनेक देशांबरोबर संघर्ष चालू आहे. इस्रायलमध्ये अधून-मधून हल्ले होत आहेत. त्यामुळे नोकरीसाठी तिथे गेलेले भारतीय लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. तिथली गंभीर परीस्थिती पाहून त्यांच्यापैकी काहीजण मायदेशी परतले आहेत. तर काही जणांसाठी मायदेशी परतणं कठीण झालं आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक भारतीय तरुण वेगवेगळी स्वप्नं घेऊन इस्रायलला गेले आहेत. त्यापैकी पैसे कमावणं हे सर्वात मोठं स्वप्न होतं. त्याप्रमाणे इस्रायलमध्ये भारतीय मजुरांना चांगले पैसे मिळत आहेत. कामाचा उत्तम मोबदला मिळत आहे. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतोय. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर इस्रायलमध्ये मजुरांची गरज होती. हजारो भारतीय तरुणांनी याकडे संधी म्हणून पाहिलं. पोटा-पाण्यासाठी भारतीय तरुणांनी तेल-अवीवची वाट धरली. २०२३ मध्ये भारत व इस्रायलमध्ये यासंबंधीचा करार देखील झाला आणि त्यातून १५ हजार भारतीय तरुण खासगी व शासकीय मार्गाने इस्रायलला गेले.
इस्रायलमधील भारतीय मजुरांनी सांगितली तिथली परिस्थिती
बहुसंख्य भारतीय मजूर इस्रायलमध्ये दर महिन्याला १.५ लाख रुपयांपासून २.५ लाख रुपये कमावतात. राजस्थानमधील झुंझुनू येथील रहिवासी सुरेंद्र सिंह सैनी यांनी सांगितलं की “भारतात एखादा जिल्हाधिकारी जितके पैसे कमावतो, तितके पैसे आम्हाला इथे मिळत आहेत”. सैनी हे तेल अवीवजवळ ड्रिलिंगचं काम करतात. दरम्यान, मूळचे हरियाणाचे रहिवासी असलेले ४३ वर्षीय धर्मवीर सिंह म्हणाले, “आम्ही तणावाच्या स्थितीत ज्या शेल्टर्समध्ये राहतो. तिथे चांगल्या सुविधा आहेत. एसी, आराम खुर्च्या आणि स्वच्छतागृह देखील आहेत”. धर्मवीर सिंह हे टायलिंगचं काम करतात. ते तेल अवीवमध्ये काम करतात.
मूळचे जींद (हरियाणा) येथील रहिवासी गुरदीप चौहान म्हणाले, “आम्ही जिथे राहत आहोत तिथे फारसा धोका नाही. मी तेल अवीवमधील प्रसिद्ध बेकरी Angel’s मध्ये काम करतो. माझ्याबरोबर इथे अनेक भारतीय कामगार आहेत”. पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी ३३ वर्षी सुभाषचंद म्हणाले, “तेल अवीवमधील हल्ल्याचे व्हिडीओ पाहून माझ्या घरातील (पंजाबमधील) सदस्य घाबरले आहेत. मी एक वर्षापासून इस्रायलमध्ये आहे. भारतात रोजगार नाहीत. आताची परिस्थिती पाहून आम्ही भारतात परतलो तर आम्हाला खूप पश्चाताप होईल”












