‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. केवळ भारतातच नाहीतर जगभरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. त्यामुळेच हास्यजत्रेचे काही शो परदेशात सुद्धा आयोजित केले जाते. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री आहे. फक्त ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीन सुद्धा या सगळ्या कलाकारांमध्ये खूप छान बॉण्डिंग आहे. याची झलक प्रेक्षकांना प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार नुकतेच एकत्र जमले होते. त्यांच्या गेट-टूगेजर पार्टीची खास झलक अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्राजक्ता या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. प्राजक्ताचं हसणं, तिची निवेदनाची शैली, ‘वाह दादा वाह’ म्हणणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे चाहत्यांना प्राजक्ताशिवाय सुद्धा हास्यजत्रा अपूर्ण वाटते.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हास्यजत्रेचे सगळे कलाकार एकत्र बसून गाण्यांची मैफिल एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गेट-टूगेदरला समीर चौघुलेंनी सुंदर जुनं गाणं गायलं. यावेळी हास्यजत्रेचे अन्य कलाकार देखील उपस्थित होते. समीर चौघुले गात असताना अभिनेता निखिल बने याने म्युझिक ड्रम वाजवून त्यांना साथ दिली.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरुण कदम, प्रभाकर मोरे, ईशा डे, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, निखिल बने, प्रथमेश शिवलकर, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर अशा सगळ्या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं, तर गेली कित्येक वर्षे हा शो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, लंडन अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे शो पार पडले आहेत. सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवर हा कार्यक्रम सोमवार ते बुधवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो.












