मुंबई: राज्य सरकराने हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र उपक्रमा अंर्तगत राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी २५ प्रशासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचा हे नियोजन मार्च एप्रिल पर्यत करावे लागते. राज्य शासनाने हा आदेश ११ जून रोजी काढला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर काढण्यात आलेल्या या आदेशाने एका वर्षात दहा कोटी झाडे लावायची कशी, असा यक्षप्रश्न सर्वच विभागांना पडला आहे.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यावधी वृक्षलागवडीचे प्रारुप आणले आहे. दरवर्षी एक दोन कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य जाहीर करताना सात वर्षापूर्वी त्यांनी थेट ३३ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले. ही लागवड नंतर वादग्रस्त ठरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे यंदा जाहीर केले आहे. या वृक्षलागवडीचा भार वन विभागावर न टाकता २५ प्रशासकीय विभागांवर टाकण्यात आला आहे. वन विभागाला केवळ दोन कोटी झाडे लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या उलट वस्त्रोद्योग विभागावर चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. नगरविकास, शालेय, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, अदिवासी, पशुसंर्वधन, पर्यटन अशा २५ विभागांचा यात समावेश आहे. राज्यातील रेल्वे व संरक्षण या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागांना लक्ष्य देण्यात आले आहे. ‘एक पेड माॅ के नाम’ उपक्रमा अंर्तगत सर्वसामान्य नागरीकांनी ५० लाख झाडे लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या वृक्षलागवडीचा लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. सर्वसाधारपणे वृक्षलागवडीसाठी पावसाळ्या अगोदर खड्डे खोदले जातात पण दहा कोटी वृक्ष लागवडीचा हा शासन निर्णय ११ जून रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे यंदा ‘मिशन दहा कोटी’वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम जुलै मधील मुसळधार पाऊस कमी झाल्यानंतर घेतला जाणार आहे. एका वर्षात दहा कोटी रुपये वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य होईल का याबद्दल प्रत्येक विभाग साशंक आहे.












