पश्चिम बंगाल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यापैकी प्रमुख घटना म्हणजे, सभागृहात घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या चार आमदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी या आमदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. या निलंबित आमदारांमध्ये भाजपाचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह आमदार दीपक बर्मन, आमदार अन्निमित्रा पॉल आणि आमदार मनोज ओराव यांचा समावेश आहे.
सभागृहाच्या पटलावरून काही वक्तव्ये हटवण्याबाबत चर्चा चालू असताना भाजपा आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर भाजपा आमदारांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. तत्पूर्वी भाजपा आमदार अग्निमित्रा पॉल यांनी महिला व बाल विकास आयोगाप्रमाणेच राज्य पुरूष आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “पुरुषांचाही घरात, बाहेर छळ होतो. पुरुषांना मारहाण व छळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच राज्य पुरुष आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे”.
पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवरून भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (२१ जून) भाजपाचे आमदार अशोक लाहिरी यांनी सहभागृहातील त्यांच्या भाषणावेळी सरकारविरोधात काही वक्तव्ये केली होती, ही वक्तव्ये द्वेषपूर्ण असल्याने ती सभागृहाच्या नियमांत बसत नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी ती पटलावरून काढून टाकली होती. दरम्यान, सोमवारी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर भाजपाचे आमदार अशोक लाहिरी सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यानंतर गोंधळ निर्माण झाला.
भाजपाचे प्रतोद शंकर घोष यांनी सभागृहात कागद फाडून निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शलने त्यांनाही सभागृहातून बाहेर काढलं. यानंतर पश्चिम बंगालचे संसदीय कार्यमंत्री सोभनदेब चट्टोपाध्याय यांनी सभागृहात विशेषाधिकारभंग प्रस्ताव मांडला. त्यांना सत्ताधारी पक्षामधील अनेक आमदारांनी पाठिंबा दिला. परिणामी भाजपाचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्यासह आमदार दीपक बर्मन, शंकर घोष, अन्निमित्रा पॉल आणि आमदार मनोज ओराव यांना विधानसभेचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.












