यूपीएससी परीक्षा ही सरकारी नोकरी क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची परीक्षा असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि आयएएस, आयपीएस अशा उच्च दर्जा च्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. पण, प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे तिन्ही स्तर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, ज्यामध्ये प्राथमिक, मुख्य व मुलाखत तीन फेऱ्यांचा समावेश असतो.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनेक जण उत्तीर्ण होतात. पण, मुलाखतीची फेरी फार कमी लोक पार करतात. जे विद्यार्थी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे ध्येय ठेवून तयारी करतात, तेच यूपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात. कारण- अशा कठीण परीक्षा देताना मेहनतीने अभ्यास करण्याबरोबर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणेसुद्धा महत्त्वाचे असते.
तर असेच एक उदाहरण आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आयपीएस नेहा जैन, ज्यांनी पूर्णवेळ नोकरी करीत असताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्णसुद्धा झाल्या. नेहा जैन मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील मोरवा येथील रहिवासी आहेत. नेहा यांनी शालेय शिक्षण त्यांच्या गावी पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीला राहायला गेल्या. त्यांनी दिल्लीतून बॅचलर पदवी मिळवली आणि पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयटीमध्ये नोकरी मिळवली.
अभ्यास करण्याचा पॅटर्न, प्लॅन बदलला
आयटीच्या नोकरीतून उदरनिर्वाह करणे ही गोष्ट नेहा यांना अजिबात पटत नव्हती. तसेच त्यांचा भाऊ हिमांशु जैन हा आयएएस अधिकारी होता. त्याच्या प्रेरणेने त्यांनी देशाची सेवा करून जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले. याचबरोबर सरकारी अधिकारी होण्याचाही त्यांचा प्रवास सुरू झाला. पण, नेहा यांनी आयटीची नोकरी सोडली नाही. नेहा काम सुटल्यानंतर वेळेचे व्यवस्थापन करून, त्या अभ्यास करत होत्या. त्याचबरोबर कोचिंग न घेताही त्या स्वतःच परीक्षेची तयारी करून मेहनत घेत होत्या. आयटीमध्ये भरपूर पगाराची नोकरी असतानाही त्यांनी यूपीएससीकडे वळण्याची तयारी दाखवली.
भरपूर अभ्यास करूनही नेहा पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत; पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात कठोर परिश्रम घेतले. त्यांनी त्या प्रयत्नात अभ्यास करण्याचा पॅटर्न अन् प्लॅन बदलला. त्या जिद्द व चिकाटीमुळे अखेर त्यांच्या पदरात यश पडलं. सरतेशेवटी त्या ऑल इंडिया रँक १५२ मिळवीत, यूपीएससी सीएसईची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि २०२१ च्या बॅचच्या IPS अधिकारी बनल्या.












