मागील लेखामध्ये (६ जून) आपण बीएससी (ऑनर्स) पदवी प्रवेशाबद्दल माहिती घेतली. आता लवकरच महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळ यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. परंतु काही वाचकांनी कृषी शिक्षणातील करिअरबद्दल कमी कालावधीमध्ये पूर्ण होणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती द्यावी अशी मागणी केली, म्हणून आपण कृषी पदविका या अभ्यासक्रमाची माहिती या लेखात घेऊ.
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदविका हा अभ्यासक्रम शिकविला जातो. कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण व सीईटी बंधनकारक आहे. ज्यांना हे शक्य नाही, परंतु शिक्षण घेण्याची आवड आहे, अशा १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी पदविका (ॲग्री डिप्लोमा) ही सुवर्णसंधी आहे. आधुनिक शिक्षणाबरोबरच शेतकरी युवक युवतींनी कृषी व्यवस्थापनासहित कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, म्हणून कृषी परिषदेने कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.












