पतीने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पाहिलं. त्यानंतर त्याचा संताप अनावर झाला. या संतापाच्या भरात त्याने पत्नीचं नाक चावलं. या घटनेनंतर पत्नी रक्तबंबाळ झाली. बुधवारी ही घटना घडली आहे. २५ वर्षांची महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे.
कुठे घडली घटना?
उत्तर प्रदेशातील हरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली. एका माणसाने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पाहिलं. राम खिलावान असं या माणसाचं नाव आहे. राम खिलवानने त्याच्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसह पाहिलं. ज्यानंतर तो खूप चिडला. त्याने तिथे जाऊन पत्नीला हे तू काय चालवलं आहेस म्हणत जाब विचारला. दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी राम खिलवानने तिच्या प्रियकरासमोरच पत्नीचं नाक चावलं. त्यानंतर रामची पत्नी जोरात ओरडली आणि रडू लागली. तिच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तिथल्या स्थानिकांनी आणि कुटुंबाने रामच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. तसंच या दरम्यान पोलिसांनाही कळवण्यात आलं होतं. या महिलेला हरडोई मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला लखनऊ या ठिकाणी पुढील उपचारांसाठी पाठवलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र कुमार यांनी माहिती दिली की राम खिलवानला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे इतर पैलूही आम्ही तपासत आहोत असंही त्यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. राम खिलवान त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड एकाच गावातले रहिवासी आहेत.












