2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात उपस्थित

मुंबई: मिठी नदी गाळ कंत्राटातील ६५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला. यावेळी त्याचा भाऊ सॅन्टिनोही त्याच्यासोबत होता. याप्रकरणी ईडीने १३ आरोपींसह डिनो मोरियाच्या घर आणि १५ हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात मुंबई व कोची येथील ठिकाणांचा समावेश होता. डिनो मोरिया युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो.

ईडीने छाप्यांपूर्वी आरोपी व संशयितांनी कथित गैरव्यवहाराच्या कालावधीत संपादित केलेल्या मालमत्ता आणि त्या मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांच्या स्रोताची तपासणी सुरू केली होती. छाप्यांमध्ये जप्त कागदपत्र व मालमत्तांच्या पडताळणीबाबत आठ जणांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यात डिनो मोरियाचाही समावेश आहे. ईडीने डिनो मोरियाला गुरूवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तो गुरूवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात दाखल झाला. यापूर्वी १४ जूनलाही ईडीने दोघांची साडेचार तास चौकशी केली होती.

याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपये नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीने मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यात कोचीतील एका ठिकाणांसह डिनो मोरियाच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश आहे. याप्रकरणातील आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात २०१९ ते २०२२ या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले होते. याच व्यवहारांच्या आधारे डिनो मोरियाची चौकशी करण्यात येत आहे. कदम व मोरिया यांची २५ वर्षांपासून ओळख आहे. त्यांच्या व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी डिनो मोरिया व त्याच्या भावाची चौकशी केली होती. आता ईडी याच प्रकरणात डिनोची चौकशी करीत आहे.

याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in