परदेशातील विद्यापीठांची तयारी ही संपूर्ण प्रक्रिया मुळातच तणावात्मक आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांचा अकरावी बारावीचा व्याप सांभाळत करणे म्हणजे त्या तणावात आणखी भर पडण्यासारखे आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावे. एकंदरीत, या विद्यापीठांची अर्जप्रक्रिया भारतातल्या विद्यापीठांच्या अर्जप्रक्रियेसारखी सरळ सोपी नाही. गुंतागुंतीची असलेली ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून अमेरिकेतील विद्यापीठांकडून वापरला गेलेला एक चांगला पर्याय म्हणजे कॉमन अॅप. कॉमन अॅप म्हणजेच कॉमन अॅप्लिकेशन. हो, सर्व विद्यापीठांना एकच समान अर्ज. अर्थात काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या प्रवेश निकषांनुसार बदलतात, जसे की प्रत्येक विद्यापीठांचे वेगवेगळे निबंध ( Essay Questions) असतात. मात्र हे निबंध ( Essays) कॉमन अॅपवरून पूर्ण करून विद्यापीठाला जमा करता येतात. कॉमनअॅपवरील अर्ज अमेरिकेतील एक हजार पेक्षाही अधिक विद्यापीठे स्वीकारतात.












