3.6 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

अनिता दाते आणि अमृता सुभाष यांच्या अभिनयाने नटलेला ‘जारण’ पाहिलात की नाही?

Jarann Movie माणसाचं मन हे अथांग समुद्रासारखं असतं. समुद्राचा तळ शोधणं जसं कठीण असतं तसंच माणसाचं मनही. या मनात शेकडो आठवणी दडलेल्या असतात. त्यातल्या काही विस्मृतीत जातात. तर काही आठवणी मात्र जखम खोलवर ठसठसत रहावी तशा आठवत राहतात. असंख्य आठवणींना विस्मृतीचा शाप असतो आणि बऱ्याच आठवणी दिवा स्वप्न किंवा कल्पनाविश्वाची देणगी बनतात. खासकरुन या सुखद किंवा दुःखदही असतात. आठवणीचा परिणाम जितका गहिरा तितकंच त्या आठवणीचं कल्पनाविश्वही गहिरं. नुकताच ‘जारण’ सिनेमा पाहिला आणि हे सगळं मनात आलं. शांत तलावात एखादा दगड टाकावा आणि तरंग उठताना बघावेत अगदी तसंच. सिनेमाही तसाच आहे. आपल्याला आपल्या आठवणींमध्ये नेणारा. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या खोल आठवणींची जाणीव करुन देणारा.

कथानक अगदी थोडक्यात

ही कथा आहे राधाची. (अमृता सुभाष) राधा ही एक भावनाप्रधान मुलगी आहे. तिच्या अनंत आठवणी तिच्या जुन्या वाड्याशी जोडल्या गेल्या आहेत. या वाड्यातली गंगुटीची (अनिता दाते) आठवण तिच्या मनावर गहिरा परिणाम करुन जाते. त्यानंतर काही गोष्टी घडत जातात. सिनेमा हळूहळू उलगडत जातो. ऋषीकेश गुप्ते लिखित दिग्दर्शित जारण सिनेमाबाबत आणखी काही सांगणं म्हणजे कथानक संपूर्ण सांगितल्यासारखं होईल. मात्र हा सिनेमा पाहणं हा एक अनुभव आहे. माणूस आपल्या मनाच्या खोल तळाशी एकदा का होईना जाऊन येतोच. जारण या शब्दाचा अर्थ काळी जादू किंवा करणी असा होतो. या जारणाशी संबंधित अनेक श्रद्धा अंधश्रद्धा समाजात आहेत. त्याबाबतही हा चित्रपट भाष्य करतो आणि माणसाच्या मनात सुरु असलेल्या आणि आजवर कधीही न उलगडलेल्या कोलाहलावरही भाष्य करतो. हे असं का? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. दरवेळी आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. ते मिळतंच असं नाही. पण निदान आपण प्रयत्न केला हे समाधान आपल्या ठायी असतं. या सिनेमात या कोलाहलावरही एक भाष्य करण्यात आलं आहे. मराठीत कैक वर्षांनी एक चांगला सिनेमा चांगला विषय आणि गहिरा आशय घेऊन आला आहे.

Jarann Movie

अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचा जबरदस्त अभिनय

अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोघींभोवती म्हणजेच राधा आणि गंगुटी यांच्या भोवती हा सिनेमा फिरतो. राधा ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली एक स्वतंत्र स्त्री आहे. तर गंगुटी जखीण आहे. सिनेमाचा ओपनिंग सीनच आपल्याला तिची पहिली झलक दाखवतो आणि मग गंगुटीचं अस्तित्व सिनेमाभर जाणवत राहतं. खरंतर सिनेमात मुख्य भूमिका आहे ती अमृता सुभाषची. अनिता दातेने साकारलेल्या गंगुटीचं दर्शन काही वेळासाठीच होतं पण तिने गंगुटी तेवढ्याच ताकदीने रंगवली आहे. अमृता सुभाषचा अभिनय लाजवाब आहे तर अनिता दाते भाव खाऊन गेली आहे. तिची भूमिका आणखी असायला हवी होती हे चित्रपट पाहताना प्रत्येकाला जाणवतंच. त्यातच या भूमिकेचं यश आहे. शिवाय जखिणीच्या भूमिकेत अनिता दातेने जे रंग भरले आहेत त्याला तोड नाही. राजन भिसे, सीमा देशमुख, किशोर कदम, ज्योती मालशे, विक्रम गायकवाड या सगळ्यांनीही त्यांची कामं चोखपणे केली आहेत. भागाबाईची भूमिकाही छान आहे. ती लक्षात राहते. पण खरी रंगत आणली आहे ती अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोघींनीच. सिनेमा या दोघींचाच आहे. “कोई मेरे दिल से पूछे तिरे तीर-ए-नीम-कश को ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता” गालिबच्या शायरी प्रमाणे अनिता दातेच्या भूमिकेबाबतची हूरहूर चित्रपट संपल्यावर आपल्याला लागते. तेच तिचं यश आहे यात शंका नाही.

चित्रपटाचं संगीत आणि तांत्रिक बाजू

चित्रपटाचं संगीत, पार्श्वसंगीत अतिशय उत्तम आहे. खास करुन गंगुटीच्या एंट्रीचं जे संगीत आहे ते मनावर गहिरा परिणाम करुन जातं. सिनेमात एकच गाणं आहे ते गाणंही लक्षात राहतं. त्याचे संदर्भ सिनेमा पाहिल्यावर कळतील असेच आहेत. तसंच सिनेमॅटोग्राफीही फार जबरदस्त आहे. जुना वाडा, राधाचा बंगला, गंगुटीचं जारण करत बसणं, तिची एंट्री हे सगळं छान टिपलं आहे. शिवाय राधाच्या मनातला कोलाहल टिपण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरण्यात आली आहे. लहानपणीची राधा, मोठी झाल्यानंतरची राधा तिचं भावविश्व या सगळ्या गोष्टी सिनेमा उत्तम पद्धतीने सांगून जातो.

क्लायमॅक्स आणि दोन ट्विस्ट

सिनेमाचा पहिला भाग आपल्या अपेक्षेपेक्षा थोडासा संथ आहे, त्याला एक सुंदर अशी लय आहे. ती लय एखादा गोफ गुंफत जावा तशी मध्यंतरापर्यंत येते. मध्यंतराला एक धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे तोदेखील छान जमला आहे. मात्र दुसऱ्या भागात सिनेमा प्रचंड वेग घेतो. शिवाय क्लायमॅक्स आणि त्यात दिलेले दोन ट्विस्ट हे तर अगदीच सरप्राईज आहे. आपण हा विचारही केलेला नसतो आणि झरझर पडद्यावर त्या गोष्टी घडत जातात. जारण करण्याची प्रथा, मानवी मनातला कोलाहल, माणसाच्या मनातल्या गहिऱ्या आठवणी, मानसशास्त्रीय परिणाम या सगळ्या सगळ्यावर भाष्य करतो. अगदी प्लॅनचेटही यात आहे. एका उंचीवर नेऊन आपल्याला एक जबरदस्त ट्वीस्ट पाहायला मिळतो. आपल्याला वाटतं हां आता संपलं. पण नाही सर्वात शेवटी एक ट्वीस्ट आणखी दिलाय तो पाहून आपण आणखी चक्रावून जातो आणि एक वेगळा सिनेमा पाहिल्याचा अनुभव घेऊन बाहेर पडतो. जारण सारख्या कलाकृती आणखी व्हायला हव्यात. मराठी चित्रपट इतका सशक्त आणि उत्तम तयार होऊ शकतो हे जारणने सिद्ध केलंय. त्यामुळे आत्तापर्यंत सिनेमा पाहिला नसेल तर नक्की पाहा. जारण पाहायला कशाला हवंय कुठलं कारण? त्यामुळे नक्की बघा जारण.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in