पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.
नदीवरील पूल पडला तेव्हा पुलावर १०० हून अधिक लोक उभे होते, स्थानिकांची माहिती
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पुलावर दुर्घटनेच्या आधी शंभरहून अधिक पर्यटक उभे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. रविवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने आज आले होते. ते पुलाच्या मधोमध उभे होते, असे स्थानिकांनी सांगितले.
कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत ३० ते ४० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे. चार बोटींच्या साहाय्याने नदीच्या पुढील भागात शोधमोहिम सुरू असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुंडमळ्यात पूल कोसळल्यानंतर काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, व्हिडीओ व्हायरल
इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे एका व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. सोशल मीडियावर या संबंधिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पावसाळ्या आधी सर्व नदी आणि पुलांची पाहणी करणं गरजेचं – सुषमा अंधारे
इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.












