इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत इराणमध्ये १३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे. इस्रायली संरक्षण दलाने रविवारी एक्सवर पोस्ट करत सांगितले की त्यांनी तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. इस्रायली सैन्याने असेही म्हटले आहे की, त्यांनी तेहरानभोवती इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित कथित ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाने आज एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायली संरक्षण दलाने आज तेहरानमधील इराणी अण्वस्त्र प्रकल्पाशी संबंधित विविध ठिकाणांवर हल्ले केले. या कारवाईत इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, अण्वस्त्र संशोधनाशी संबंधित एसपीएनडी प्रकल्पाचे केंद्र आणि इतर महत्त्वाची ठिकाणे लक्ष्य करण्यात आली.”
इराणने दिलेल्या माहितीनुसार तेहरानमधील शाहरान तेल डेपोवर इस्रायली हल्ला झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. राजधानीजवळील एका तेल शुद्धीकरण केंद्रावर इस्रायली हल्ल्यानंतर आगही लागली. इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलने तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवरही हल्ला केला असून, त्यात किरकोळ नुकसान झाले.
इराणच्या अणुस्थळांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे तणाव निर्माण झाला असून, ज्यामध्ये ७८ लोकांचा मृत्यू झाला आणि ३२० हून अधिक लोक जखमी झाले, असे इराणच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूताने सांगितले. त्यांनी सांगितले की, या कारवाईत जनरल आणि शास्त्रज्ञांना लक्ष्य केले गेले होते, तरीही बहुतेक बळी नागरिक होते. इराणने इस्रायलला लक्ष्य करून दोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी या प्रत्युत्तर दिले, दोन्ही हल्ल्यांमध्ये किमान ४१ लोक जखमी झाले आहेत.












