परभणी : एका २५ वर्षीय विवाहितेने स्वतःच्या दोन वर्षाच्या चिमुकल्यास पोटाला बांधून गोदावरी नदीत उडी मारल्याची घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी सात वाजता घडली आहे. गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी येथील ही महिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भांबरवाडी येथील प्रतिभा गजानन भामरे या महिलेने आपल्या माणिक नावाच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला कमरेला बांधून गोदावरी नदीत उडी मारली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. परभणी- गंगाखेड रस्त्यावरील खळी पुलाजवळ असलेल्या गोदावरी पात्रात या महिलेने सायंकाळच्या सुमारास उडी मारली. मुळी येथील बंधाऱ्यामुळे पाणी तुडुंब असल्याने बुडण्यास वेळ लागला नाही.
घटनेचे वृत्त कळताच गंगाखेड पोलिसांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नदीत शोधाशोध करून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी मयत महिलेचे आधार कार्ड व चिट्ठी आढळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मयत महिलेचा पती व सासरची मंडळी फरार झाले असून या मंडळीचा शोध घेण्यासाठी गंगाखेड पोलिसांनी सूत्रे हलवली आहेत. सासरची मंडळी फरार झाल्याने याप्रकरणी घातपाताचा संशय येत आहे.












