लोकप्रिय गायक संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूबच्या शॉर्ट व्हिडीओपर्यंत सर्वत्र नेटकरी ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला संजूच्या गाण्याची भुरळ पडली आहे.
हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आयशा खानने नुकताच संजू राठोडच्या ट्रेंडिंग ‘शेकी-शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. आयशा ‘बिग बॉस’च्या सतराव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. याशिवाय तिने काही तेलुगू सिनेमांमध्येही काम केलेलं आहे. आयशाचा चाहतावर्ग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे.
साडी नेसून, मराठमोळा लूक करून आयशाने संजूच्या ट्रेंडिंग गाण्यावर “एक नंबर तुझी कंबर” म्हणत ठेका धरल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सुंदर मोरपिशी रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या पारंपरिक लूकमध्ये आयशा खूपच सुंदर दिसत होती. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. संजू राठोडने स्वत: आयशाच्या व्हिडीओवर कमेंट करत “ओहो सुंदर…” असं म्हटलं आहे.
आयशा खानच्या ‘शेकी’ गाण्यावरील डान्स व्हिडीओला तब्बल ४१ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच यावर आयशाच्या चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. “तुझे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत”, “आयशा खूपच छान व्हिडीओ केलास”, “साडी नेसलीस त्यासाठी एक लाइक बनतोच”, “शेकी गाण्यावरचं आतापर्यंतचं बेस्ट रील”, “संजू राठोड प्लीज पुढच्या व्हिडीओमध्ये हिलाच घे”, “आयशा परफेक्ट हूकस्टेप्स केल्या आहेस” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं यंदा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं सोशल मीडियावर सुपरहिट झालं आहे. मूळ गाण्यात संजूसह अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. ‘Shaky’ या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे.












