नागपूर : राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून अधिक काळापासून मोसमी पावसाची वाटचाल रखडलेली आहे. मात्र, येत्या दोन दिवसात मोसमी पावसाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात मोसमी पाऊस संपूर्ण राज्य वापणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
मे महिन्याच्या अखेरीसपासून पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरडी हवा भारतात आली. त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या वाऱ्यांवर झाला आणि वारे कमकुवत झाले. त्यामुळे मोसमी पाऊस फारसा क्रियाशील झाला नाही आणि त्यात घट झाली होती. याच कालावधीत तापमानात देखील वाढ झाली. नऊ जूनला नागपूर येथे ४४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. तर १२ जूनला ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान होते. राज्याच्या उर्वरित भागात देखील या कालावधीत तापमानात वाढ झालेली दिसून आली. वाढलेली आर्द्रता आणि ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे विदर्भात आणि प्रामुख्याने पूर्व विदर्भात उकाडा जाणवत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात पुन्हा एकदा घट होऊ लागली आहे. येत्या १५ ते १६ जूनपासून विदर्भासह इतर भागातील कमाल तापमानात आणखी घट दिसून येईल.
दक्षिण चायनाच्या समुद्रात ‘वूटीप’ नावाचे एक चक्रीवादळ तयार झाले आहे, जे मोसमी पावसाचे वारे भारताकडे ओढण्यात मदत करत आहेत. येत्या दिवसात मोसमी पावसाचे वारे अजून सक्रीय होणार असल्यामुळे रखडलेला मोसमी पावसाचा प्रवास १५ जूनपासून राज्यासह पूर्व भारतात परत सुरू होणार आहे.
भारताच्या मान्सूनवर हजारो किलोमीटर दूर असलेल्या इतर देशातील हवामानाचा परिणाम होतो. मे च्या शेवटी हजारो किलोमीटर दुरून कोरडी हवा आली, ज्यामुळे मान्सूनचा प्रवास थांबला. आता हजारो किलोमीटर दुरून व्हिएतनाम जवळ चक्रीवादळामुळे मान्सूनच्या गती मिळाली.












