वाशिम, (दि. ३ सप्टेंबर): ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी आणि पंचायतराज संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत वाशिम येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा आज (दि. ३ सप्टेंबर, २०२५) यशस्वीपणे पार पडली. कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी परिविक्षाधीन आयएएस आशिष वर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

📌 पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन
पालकमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले –
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे फक्त एक शासकीय कार्यक्रम नाही, तर गावाच्या विकासासाठी एक नवीन मार्ग आहे. हे गावाच्या उन्नतीची पहाट आहे.”
ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे. गावकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रगती साधण्याचे केंद्र म्हणजे पंचायत. प्रभावी प्रशासनाशिवाय खरी प्रगती शक्य नाही.
गावोगावी विकासाची आरोग्यदायी स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
या अभियानाचा उद्देश गावांना आत्मनिर्भर बनवणे आहे. गावासाठी ध्येय निश्चित करताना त्यांनी नमूद केले की – तरुणांना शिक्षणानंतर गावातच राहता यावे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. प्रत्येक घरात रोजगार उपलब्ध व्हावा. चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. मुला-मुलींना उज्ज्वल भविष्य मिळावे.
हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविले जाणार आहे. “शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम २०३०” शी सुसंगत अशी रचना या अभियानाला देण्यात आली आहे.
सात प्रमुख घटकांवर गुणांकन केले जाईल :
1. सुशासन युक्त पंचायत – सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करणे.
2. सक्षम पंचायत – स्व-निधी, लोकवर्गणी आणि सीएसआरद्वारे आर्थिक बळकटी.
3. जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव – जलव्यवस्थापन, स्वच्छता, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन.
4. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण – प्रभावी अंमलबजावणी.
5. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण – ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इत्यादी सुविधा उभारणे.
6. उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय – घरकुल योजना, बचत गटांना प्रोत्साहन.
7. लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ – नागरिकांच्या थेट सहभागातून विकासकामे.📌 कार्यशाळेतील महत्वाचे मुद्दे
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून ग्रामस्तरीय समितीची स्थापना होईल.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. आत्माराम बोंद्रे यांनी अभियानाविषयी सविस्तर प्रस्तावना सादर केली.
तज्ज्ञांनी लोकसहभाग, जनजागृती व अंमलबजावणीसंबंधी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वी पार पडण्यात सहायक गटविकास अधिकारी गजानन खुळे, विस्तार अधिकारी सतीश नायसे, क.प्र.अ. अमोल कापसे, वैशाली मिसाळ यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
सूत्रसंचालन नेहा काळे यांनी केले.या कार्यशाळेद्वारे जिल्हा प्रशासनाने ग्राम विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागीय अधिकाऱ्यांचा सहभाग सुनिश्चित केला. या अभियानामुळे वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












