रिठद प्राथमिक आरोग्य केंद्राचे खरे उद्घाटन – पहिल्या प्रसूतीने ग्रामीण आरोग्य सेवेला नवा श्वास
वाशिम, दि. 16 ऑगस्ट –
काल स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते रिठद प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले. मात्र या आरोग्य केंद्राचे खरे उद्घाटन आज दुपारी झाले, जेव्हा येथे पहिली प्रसूती यशस्वीरित्या पार पडली. माता व बाळ दोघेही सुखरूप असून संपूर्ण आरोग्य टीमने ही प्रसूती सुरक्षितरीत्या केली. ही प्रसूती ए. एन. कुटे व आर. एन. कुटे यांनी पार पाडली. त्यांना केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यामध्ये डॉ. शिंदे मॅडम, डॉ. कव्हर मॅडम, श्री. बोरकर (आ.से.), श्री. इढोळे (आ.से.), श्री. बोरचाटे (आ.से.) तसेच कु. पी. एस. भालेराव (ए.एन.एम.) यांचा विशेष सहभाग होता. या ऐतिहासिक प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे म्हणाले –
“आरोग्य केंद्र हे केवळ इमारतीपुरते मर्यादित नसते, तर तेथील सेवाभावामुळे त्याला खरी ओळख मिळते. आज पहिली प्रसूती यशस्वीरित्या पार पडणे हा रिठद केंद्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. हे केंद्र ग्रामीण मातांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरेल आणि आरोग्य सेवेत आदर्श निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.”दरम्यान, प्रसूती झालेल्या आईच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले –
“आज आमच्या घरात बाळाचा जन्म झाला आणि तोही अगदी गावातल्या आरोग्य केंद्रात. याआधी प्रसूतीसाठी आम्हाला दूरवरच्या दवाखान्यात जावे लागत होते, पण आता आपल्या गावातच इतकी चांगली सुविधा मिळाली आहे. आम्ही सर्व कुटुंबीय या सेवेसाठी आरोग्य विभागाचे आभारी आहोत.”या पहिल्या यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून रिठद प्राथमिक आरोग्य केंद्राचे खरेखुरे उद्घाटन झाल्याचे ग्रामस्थ मान्य करत आहेत.












