वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला नवा चेहरा देणारे आणि शासकीय रुग्णालयांतील प्रसुतींची संख्या ऐतिहासिक पातळीवर नेणारे अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांचे कार्य वाखाणण्याजोगे ठरले आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील बहुतांश महिला खाजगी दवाखान्यांमध्ये प्रसुती करत होत्या. अनेकदा नॉर्मल प्रसुतीदेखील अनावश्यक सिजेरियनमध्ये रूपांतरित होत होती, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये शासकीय रुग्णालयांबाबत अनास्था होती.
परंतु डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर एक वेगळाच सकारात्मक बदल घडून आला. त्यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभाग मजबूत केले. प्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक, नर्सिंग स्टाफला विशेष मार्गदर्शन, सुविधायुक्त प्रसुती कक्ष उभारणी आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी जनजागृती अशा बहुपर्यायी उपाययोजना राबविल्या.
या प्रयत्नांना आशातीत यश मिळाले असून, अल्पावधीत शासकीय संस्थांमधील प्रसुतींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी जेथे महिलांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता, तेथील महिला आता निर्धास्तपणे शासकीय रुग्णालयांमध्ये येऊ लागल्या आहेत. सिजेरियनच्या प्रमाणात घट होत असून नॉर्मल डिलिव्हरीला प्रोत्साहन दिले जात आहे.
डॉ. ठोंबरे यांचे हे कार्य केवळ एक प्रशासनिक यश नसून, समाजात शासकीय आरोग्य यंत्रणेचा विश्वास पुनर्स्थापित करणारे पाऊल आहे. जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यू दरात घट करण्यासाठीही त्यांचे हे कार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे












