विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, विधानसभेत आज (१५ जुलै) आमदार वरुण सरदेसाई, आमदार राम कदम व आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांसह केंद्रीय संस्थांच्या, संरक्षण दलाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवरील विकासकामांचा मुद्दा मांडला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ शासकीय कागदपत्रांवरील उत्तर दिलं. ज्यावर, विरोधी पक्षांच्या आमदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शंभूराज देसाई संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच दोन्ही शिवसेनेच्या (ठाकरे व शिंदे) नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
आमदार वरुण सरदेसाई म्हणाले होते की “तुम्हाला सचिवांनी जेवढी माहिती दिलीय तेवढंच उत्तर देताय. परंतु, मला ठराविक वेळ मर्यादा सांगा की ही कामं नेमकी कधीपर्यंत पूर्ण होतील.” त्यावर शंभूराज देसाईंचा पारा चढला आणि ते म्हणाले, “२०१९ ते २०२२ या कालावधीत ज्यांचं सरकार होतं त्यांनी या गोष्टीचा किती पाठपुरावा केला?”
शंभूराज देसाई काय म्हणाले?
शंभूराज देसाई म्हणाले, “घाटकोपरमधील संरक्षण दलाच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यापैकी अर्धी जमीन वायूदलाची व अर्धी संरक्षण दलाची आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडू व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती करू. मात्र, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याआधी ज्या-ज्या विधानसभा सदस्यांच्या मतदारसंघांचा संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे त्यांनी माझ्या दालनात यावं. आपण यासंबंधी एक बैठक घेऊन सविस्तर प्रारुप तयार करू आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करू.”
वरुण सरदेसाईंचं ते वक्तव्य अन् मंत्री देसाईंचा पारा चढला
यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासामाचा मुद्दा उपस्थित केला. तर, वरुण सरदेसाई म्हणाले, “गृहनिर्माण विभागाअंतर्गत टॉप प्रायोरिटी म्हणून या गोष्टीचा पाठपुरावा करावा. कारण गेल्या आठ वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. २०१७ पासून अनेक अधिवेशनांमध्ये माझ्या मतदारसंघातील संरक्षण दालाच्या जागेवरील विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ते काम प्रलंबित आहे. अजूनही मंत्री हे काम कधीपर्यंत होईल ते सांगत नाहीत. केवळ त्यांच्या सचिवांनी दिलेलं ब्रीफिंग (माहिती) वाचून दाखवायचं काम करत आहेत.”












