वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल लागण्यासाठी आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पुरावे शोधण्यासाठी अर्जुन धडपड करत असल्याचं सध्या मालिकेत पाहायला मिळतंय. नुकताच अर्जुन सरंजामे यांच्या घरी पोहोचला होता. यावेळी सरंजामे देखील महिपतला सामील असल्याचा संशय अर्जुनला येतो. सरंजामेला तो थेट ताकीद देतो पण, अर्जुनकडे महत्त्वाचे पुरावे नसतात. आता अवघ्या १५ दिवसांत सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावायच्या या विचारात अर्जुन आहे.
आश्रमात सापडलेलं साक्षीचं अर्ध पेंडंट हा आश्रम केसमधील सगळ्यात मोठा पुरावा असल्याचं अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे आता काहीही करून पुन्हा एकदा साक्षी शिखरेच्या घरी शोधाशोध करायला जावं लागेल असं तो सायलीला सांगतो. व्हिजिटिंग कार्ड आणि पेडंटचा तुकडा या दोन्ही वस्तू कोर्टात सादर केल्यावर निकाल नक्की फिरेल याची खात्री अर्जुनला असते.
याच पार्श्वभूमीवर साक्षीच्या घरातील सर्वात महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी आता अर्जुन एक वेगळंच रुप घेणार आहे. पिकलेले लांब केस, मोठी दाढी असा वेगळाच लूक करून अर्जुन साक्षी शिखरेच्या घरी जाणार आहे.












