1.4 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; “पुण्यात ‘संन्यस्त खड्ग’ नाटकाचा प्रयोगात गौतम बुद्धांचा अपमान नाही, आंदोलकांनी…”

१२ जुलै रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान हे नाटक बंद पाडलं गेलं अशा बातम्या आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

काय आहे हृषिकेश जोशींची पोस्ट?

१२ जुलै रोजी संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरू केली. त्यांनी त्यांची घोषणाबाजी केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. वास्तवात घडलेला घटनाक्रम असा होता की, जे कुणी आंदोलक आले होते, ते नाटक पाहायला शेवटपर्यंत बसले होते. अडीच तासाच्या नाटकात शेवटचा प्रसंग सुरू झाला… शेवटचा म्हणजे किती, की अगदी सामान्य प्रेक्षकालाही लक्षात येत होतं की, पुढच्या एखाद मिनिटात नाटक संपणार आहे. विक्रमसिंह या पात्राच्या तोंडी जी दोन वाक्ये होती त्यातलं पहिलं वाक्य झालं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.. त्याचवेळी हे आंदोलक घोषणा देत रंगमंचाकडे आले, स्टेजवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.. पोलिसांनी त्यांना अडवलं. मंचावर सर्वच पात्रे होती. आंदोलकांच्या घोषणा होईपर्यंत कलाकार आणि तंत्रज्ञ शांतपणे उभे राहिले. प्रयोगाला खासदार मेधाताई कुलकर्णी पहिल्या रांगेत नाटक बघायला बसल्या होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. घोषणा देणारे बाहेर गेले. प्रेक्षकांनी आवाज दिला. “सुरू करा नाटक.” दिग्दर्शक या नात्याने मी पुढे होऊन प्रयोग सुरू केला. गौतम बुद्धांचा अनुयायी असलेल्या, बुद्धांच्याच सांगण्यावरून संन्यास घेतलेल्या विक्रमसिंहाचं पुढचं एकंच वाक्य उरलं होतं.. ते असं की, “ मला क्षमा करा भगवन.” तोवर नाट्यगृहाबाहेर अधिक संख्येच्या लोकांची घोषणाबाजी आत ऐकू येत होती. नाटक पुन्हा सुरू होऊन, जे उरलेच काही सेकंदांचे होते ते पार पडले. प्रथेप्रमाणे कलाकारांची ओळख झाली. बाहेरचा गोंधळ थांबे पर्यंत प्रेक्षकांना आतच बसा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. प्रेक्षकांनी नुसतच बसण्यापेक्षा सुलोचना या पात्राच्या तोंडी असलेल्या गाण्याची फर्माइश दिली. जे गाणे नाटकात सादर केले जात नाही, ते केतकी चैतन्य हिने अप्रतिम सादर केले. त्या गाण्याचे बोल असे आहेत की,
सुकताचि जगी या, जरी की,
फुले गळत पाकळी पाकळी
उमलती ना त्याही कलिका,
ज्या..
परंतू सुंदर पाकळ्या पाकळ्या
फुलती ही जगी या..
विसर ना हे वैतागी तुझिया

नाटक पार पडलं आणि…

नाटक पार पडले, प्रेक्षक कलाकाराना भेटायला आत आले. पण खरे राहून राहून आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की, नाटक संपून मिनिट दोन मिनिट होत नाहीत तोवर, पुण्यात संन्यस्त खड्ग नाटक बंद ‘पाडले’ अशा ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. हे नाटक ‘सावरकरांच्या जीवनावर आधारित’ असल्याचा बातमीतला पहिलाच उल्लेख ऐकून समस्त कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही प्रचंड धक्का बसला. न्यूज चॅनेलची निवेदिका, इतक्या ‘तातडीने घटनास्थळी’ उपस्थित असलेल्या वार्ताहराला विचारत होती की, “तिथली नक्की परिस्थिती काय आहे? दोन बाजूने घोषणाबाजी नक्की कोणत्या कारणावरून होत आहे?” त्यावर त्या घटनास्थळी वार्ताहराने उत्तर दिले की, “का घोषणा दिल्या जातायत त्या बद्दल मला नक्की माहीत नाही”. हा नाट्यप्रयोग, ज्याला सातत्याने ‘कार्यक्रम’ संबोधलं गेलं, हा सात्यकी सावरकरांनी आयोजित केला होता असा किमान ५ वेळा उल्लेख बातम्यांमध्ये येत होता. ते प्रयोगाला उपस्थित आहेत असंही वार्ताहर बोलला. मुळात एरव्ही व्यावसायिक नाटक जसे नाट्यगृहात तारीख घेऊन लावले जाते तसे या नाटकाचा प्रयोग नाट्यनिर्मात्यांनी लावला होता. त्याचा सात्यकी सावरकरांशी काहीही संबंध नव्हता. ते प्रयोगाला उपस्थितही नव्हते. “नाटक किती वेळानंतर बंद पाडण्यात आले?” या प्रश्नावर वार्ताहर म्हणाला की, “अर्ध्या तासानंतर ते बंद पाडण्यात आले.”

वृत्त वाहिन्यांनी उपस्थित असलेल्या निर्माता, दिग्दर्शक, मॅनेजर, कलाकार यांच्या पैकी कुणालाही फोन केला असता, तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. आणि समजले असते की, व्यत्यय आणला गेला, पण नाटक व्यवस्थित उपस्थित प्रेक्षकांसमोर पूर्ण पार पडले. ‘उपस्थित असलेल्या वार्ताहराने’ ज्या बाबी सांगितल्या त्या सगळ्या सपशेल खोट्या होत्या हे इथे सखेद नमूद करावे लागेल. अशी पोस्ट हृषिकेश जोशींनी केली आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in