कराड : कोयना धरणाची जलपातळी दरवाजाला टेकली असली तरी पाणलोटातील जोरदार पाऊसही ओसरला आणि धरणातील जलआवकही घटल्याने धरणाच्या सहा वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात करावयाचा जलविसर्ग तूर्तास तरी करण्यात येणार नसल्याचे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सध्या कोयनेचा जलसाठा ७३.७० टीएमसी (अब्ज घनफूट) असून, धरणाच्या दरवाजाला पाणी टेकले आहे. यावर दरवाजातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापन सतर्क आहे. मात्र, पाणलोटात काही महसूल मंडलांचा अपवाद वगळता सर्वदूर मध्यम ते तुरळक पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी, कोयना धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ४० हजार क्युसेकवरून (घनफूट) सात हजार क्युसेकसमीप येऊन ठेपली आहे. दुसरीकडे दोन-चार दिवसात पाऊस ओसरताना लख्ख सूर्यप्रकाश पडू लागल्याने खरीप पेरण्यांना पोषक वातावरण होत असून, शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे.












