6.1 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुंबई, पुणे, नागपूरहून साल्हेर किल्ल्यावर कसे पोहोचता येईल ?

नाशिक – बागलाण तालुक्यात कुठूनही साल्हेर किल्ला दृष्टीपथास पडतो. इतका तो उत्तुंग आहे. महाराष्ट्राच्या एकदम एका टोकाला, गुजरात सीमेलगतच्या साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्यामुळे इतिहास अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि पर्यटक स्वराज्यातील या उत्तुंग, बेलाग किल्ल्याकडे निश्चितच आकर्षित होतील. मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील, परराज्यातून साल्हेर किल्ल्यापर्यंत कसे पोहोचता येईल, वाहतूक व निवास व्यवस्था कशी आहे, याबाबतची ही माहिती.

साल्हेरचा ऐतिहासिक वारसा

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात उत्तुंग व अभेद्य साल्हेर किल्ला आहे. डोलाबारी पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून तो ५१४१ फूट उंचीवर आहे. तालुक्यात कुठूनही नजर फिरवा तो दृष्टीपथास पडतो, असे बागलाणवासीय अभिमानाने सांगतात. या ठिकाणी पोहोचल्यावर त्याची अनुभूती घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला होता. याच भूमीवर इतिहास प्रसिद्ध साल्हेरची लढाई लढली गेली. मराठा सैन्याने मोगलांविरुद्ध खुल्या मैदानात जिंकलेली पहिली लढाई म्हणून तिची गणना होते. सुरत लुटीच्या वेळी शिवाजी महाराज साल्हेरजवळून गेल्याचे संदर्भ काही ग्रंथात आहेत. साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावरून सभोवतालचे मोरा-मुल्हेर, रतनगड, हरगड, पिंपळा आदी किल्ले दिसतात. जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असणारे मांगी-तुंगी दृष्टीपथास पडते.

किल्ल्यापर्यंत कसे जाता येईल ?

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातून रस्ते मार्गाने साल्हेर किल्ला सुमारे ३०० किलोमीटर आहे. पुण्याहून नाशिक किंवा शिर्डीमार्गे साधारणत: ३५० किलोमीटर प्रवास करावा लागेल. नागपूर, विदर्भ, पुणे, मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्यांना रेल्वे मार्गाचाही उत्तम पर्याय आहे. मनमाड रेल्वे स्थानकात उतरून पुढे रस्ते मार्गाने ११० किलोमीटरचा प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. मुंबई, ठाणे आणि सभोवतालच्या परिसरातून रस्ते मार्गाने  येणाऱ्यांना प्रथम नाशिक गाठावे लागेल.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून तसेच पुढे (धुळ्याकडे) जाताना वडाळीभोई सोडल्यानंतर सोग्रस फाटा लागतो. तिथून डावीकडे वळण घेऊन भावडभारी घाट उतरून देवळामार्गे पुढे सटाण्याकडे जाता येते. सटाण्याहून ताहाराबाद आणि ताहाराबादहून साल्हेर गाठता येते. नाशिकपासून सटाणा हे अंतर ९० किलोमीटर आहे. या प्रवासाला दीड ते दोन तास लागतात. सोलापूर, अहिल्यानगर भागातून येणाऱ्यांना शिर्डी-साक्री महामार्गाने सटाण्याला येण्याचा पर्याय आहे. शिर्डी ते सटाणा हे अंतर १२० किलोमीटर आहे. धुळे, नंदुरबार आणि गुजरातमधून येणाऱ्यांना साक्री-शिर्डी मार्ग सोयीस्कर ठरतो.

सटाण्याहून पर्याय

सटाणा हे बागलाण तालुक्याचे मुख्य ठिकाण. तिथून साल्हेर किल्ल्याकडे जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. यात डोंगर-दऱ्यांमधून निसर्गाची मुक्तहस्ते झालेली उधळण पाहत जाता येईल असा एक मार्ग आहे. दोन मार्गांनी सटाण्याहून साल्हेर किल्ला ४५ ते ४८ किलोमीटर अंतरावर आहे. तर २० किलोमीटर अंतर कमी करणारा मधला एक मार्ग आहे. यातील पहिला मार्ग म्हणजे सटाणा, ताहाराबादमार्गे अंतापूर-मांगीतुंगी- मुल्हेर- हरणबारी करून साल्हेरकडे जाता येते.

सटाणा, मुंजवाड, डांगसौंदाणे, केळझर धरणावरून दुसरा घाट मार्ग आहे. वळणावळणाच्या या रस्त्याने प्रवासाला वेळ लागतो. निसर्गसौंदर्याची अनुभूती देणारा सटाणा-मुंजवाड-कपालेश्वर- पठावे-पिसोरेवरून महारदर-साल्हेर हा साधारणत: ३२ किलोमीटरचा सर्वात जवळचा मार्ग आहे. साल्हेरकडे जाणारे हे तिन्ही रस्ते साक्री-शिर्डी महामार्गावर आहेत. गुजरात, नंदुरबार, धुळ्याकडून येणाऱ्यांना पिंपळनेरकडून येता येईल. पिंपळनेरहून जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी आणि ताहाराबाद १९ किलोमीटर सारखे अंतर आहे. मांगीतुंगी करून अंतापूर, मुल्हेर,  कपारभवानी, हरणबारीकडून साल्हेरला पोहचता येईल.

वाहतूक सुविधा

सटाण्याहून साल्हेर किल्ल्याला जाण्यासाठी सध्या तरी थेट बस नाही. पुढील काळात नाशिक वा आसपासच्या भागातून ही व्यवस्था होऊ शकते. सध्याची सटाणा-मानूर बस साल्हेरहून जाते.  बसने किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी दिवसभरात सकाळ व सायंकाळ अशा केवळ दोन बस आहेत. मानोरे हे गुजरात सीमेलगतचे शेवटचे गाव आहे. साल्हेर ग्रुप ग्रामपंचायतीचा ते भाग आहे. सटाण्याहून खासगी वाहनाने साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याचा पर्याय निवडता येईल. या प्रवासाला अर्धा ते पाऊण तास लागू शकतो.

निवास व्यवस्था

साल्हेर किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मांगीतुंगी, ताहाराबाद, मुल्हेर या ठिकाणी निवास व्यवस्था आहे. साल्हेर येथे वन विभागाचे विश्रांतीगृह आहे. कृषी पर्यटन अंतर्गत साल्हेर किल्ला पर्यटन केंद्राच्या ठिकाणी चार ते पाच कुटुंब राहतील अशी व्यवस्था आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मुक्कामाचे शेवटचे ठिकाण या योजनेंतर्गत शासन जागा उपलब्ध असणाऱ्या स्थानिकांना बांबूची घरे बांधून देणार आहे. जेणेकरून पर्यटकांच्या निवासाची सोय होईल. ग्रामीण भागातील खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केलेले आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in