नागपूर : जनसुरक्षा कायदा राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनेच्या विरुद्ध नाही तर नक्षलवादी चळवळ नवीन पिढीकडे घेऊन चाललेल्या संघटनांना जेरबंद करणारा हा कायदा आहे. पण, काही नेते मंडळी केवळ त्यांच्या पक्षासाठी विरोध करावे लागते म्हणून तसे करत आहेत, असे वक्तव्य महसूल मंत्री व संयुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय व्यवस्थेविरुद्ध समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांना जेरबंद करण्याकरिता महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा कायदा केला आहे. राज्याच्या जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मालमत्तेचे नुकसान आणि लोकांचे जीव घेणारी नक्षल चळवळ आहे. या चळवळीला साथ देणारी, त्यांना निधी पुरवणाऱ्या संघटना, विद्यापीठात राहून नवीन पिढीला नक्षलवादी विचारांकडे वळवणारी संघटना, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना ज्यांना आपले संविधान मान्य नाही.
संविधानावर टीका करतात, ज्यांना न्यायालय मान्य नाही. त्यावर आवर घालण्यासाठी हा कायदा आहे. या कायद्याने महाराष्ट्रातील ज्या अशा चळवळी आहेत, त्या जेरबंद घालता येईल. देशातील चार राज्यांनी अशाप्रकारचा कायदा केला आहे.












